Tarun Bharat

रणजी करंडक प्रथमच मध्य प्रदेशकडे

Advertisements

अंतिम लढतीत बलाढय़ मुंबईवर 6 गडय़ांनी मात, शुभम शर्मा सामनावीर

वृत्तसंस्था/ बेंगळूर

सर्वात जुनी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया रणजी स्पर्धेत मध्य प्रदेशने नवा इतिहास घडविताना रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यातील शेवटच्या दिवशी बलाढय़ मुंबईचा सहा गडय़ांनी पराभव केला. मुंबईचा माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडितच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश क्रिकेट संघाने रणजी करंडकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला.

या स्पर्धेत मुंबईचा पहिला डाव 374 धावांवर आटोपला. सर्फराज खानने शानदार शतक तर यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकविले. मध्य प्रदेशतर्फे गौरव यादव आणि अगरवाल प्रभावी गोलंदाज ठरले. त्यानंतर मध्यप्रदेशने आपल्या पहिल्या डावात 536 धावांचा डोंगर रचला. खेळाच्या तिसऱया दिवशी मध्य प्रदेशने पहिल्या डावात 3 बाद 368 धावापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावांवर संपुष्टात आला. मध्य प्रदेशने पहिल्या डावात मुंबईवर 162 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. मध्य प्रदेशच्या पहिल्या डावात सलामीचा यश दुबे (133), शुभम शर्मा (116), रजत पाटीदार (122) यांनी दमदार शतके झळकविली. एस जैनने अर्धशतक (57) नोंदविले. मुंबईतर्फे मुलानीने 5 तर तुषार देशपांडेने 3 आणि अवस्थीने 2 गडी बाद केले.

शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर मुंबईने दुसऱया डावात 2 बाद 113 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून मुंबईने रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या उर्वरित आठ गडय़ांनी 156 धावांची भर घातली. मुंबईचा दुसरा डाव 57.3 षटकांत 269 धावांवर आटोपला. मुंबईच्या दुसऱया डावात कर्णधार पृथ्वी शॉ ने 44, हार्दिक तमोरेने 25, अरमान जाफरने 37, सुवेद पारकरने 51, सर्फराज खानने 45, अवस्थीने 15, कोटीयनने 11, मुलानीने 17 धावा जमविल्या. मध्य प्रदेशने कुमार कार्तिकेय यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 98 धावांत 4, गौरव यादव व सहानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मध्य प्रदेशला निर्णायक विजयासाठी 108 धावांची जरूरी भासली.

मध्य प्रदेशने दुसऱया डावात 29.5 षटकांत 4 बाद 108 धावा जमवित मुंबईवर निर्णायक विजय मिळविला. मध्य प्रदेशच्या दुसऱया डावात सलामीच्या मंत्रीने 3 चौकारांसह 37, दुबेने 1, शुभम शर्माने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 30, सहानीने 5, पाटीदारने 37 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 30 तर कर्णधार श्रीवास्तवने नाबाद 1 धाव जमविली. मुंबईतर्फे मुलानीने 41 धावांत 3 तर धवल कुलकर्णीने 1 गडी बाद केला.

2010 पासून नव्या संघांचा उदय

बलाढय़ मुंबई संघाने आतापर्यंत 41 वेळा रणजी करंडक पटकाविला असून मध्य प्रदेशच्या शानदार कामगिरीमुळे त्यांचे 42 वे विजेतेपद हुकले. 2010 पासून रणजी स्पर्धेवर काही काळ कर्नाटकाने व एकदा मुंबईला जेतेपद मिळाले होते. हा अपवाद वगळता नवख्या संघांनीच यश मिळविल्याचे दिसून येते. राजस्थानने दोनवेळा, विदर्भने दोन वेळा, सौराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांनी प्रत्येकी एकदा रणजी स्पर्धा जिंकली आहे. रणजी स्पर्धेमध्ये यापूर्वी मुंबईचे अनेक वर्षे वर्चस्व होते. पण पण आता ते मुंबई, दिल्ली तसेच बेंगळूर किंवा कोलकाताऐवजी नव्या शहरांकडे जात असल्याचे दिसून येते. मध्य प्रदेशने भारतीय क्रिकेटला अनेक क्रिकेटपटू दिले असून त्यामध्ये फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवाणी, राजेश चौहान, अमेय खुरासिया यांचा समावेश आहे. 1990 आणि 2000 च्या दशकामध्ये मध्य प्रदेशकडून मध्यफळीत खेळणारा फलंदाज देवेंद्र बुंदेला मात्र कमनशिबी ठरला. याच कालावधीत सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या फलंदाजांनी वर्चस्व राखत मध्यफळी मजबूत केली होती.

संक्षिप्त धावफलक

मुंबई प. डाव- 127.4 षटकांत सर्वबाद 374, मध्य प्रदेश प.डाव-177.2 षटकांत सर्वबाद 536, मुंबई दु. डाव- 57.3 षटकांत सर्वबाद 269 (सुवेद पारकर 51, सर्फराज खान 45, शॉ 44, तमोरे 25, जाफर 37, कार्तिकेय 4-98, यादव 2-53, सहानी 2-43 ), मध्य प्रदेश दु. डाव- 29.5 षटकांत 4 बाद 108 (मंत्री 37, दुबे 1, शुभम शर्मा 30, सहानी 5, पाटीदार नाबाद 30, श्रीवास्तव नाबाद 1, मुलानी 3-41, कुलकर्णी 1-7).

कर्णधार म्हणून अधुरे राहिलेले स्वप्न प्रशिक्षक बनून पूर्ण केले

चंद्रकांत पंडित मध्य प्रदेश संघाच्या कर्णधारपदी असताना रणजी ट्रॉफी मिळवून देऊ शकले नाहीत. परंतु आता प्रशिक्षकाच्या रुपात त्यांनी ही कमाल केली आहे. 1998-99 रणजी हंगामात मध्य प्रदेश आणि कर्नाटक संघ आमने सामने होते. कर्नाटकने हा सामना जिंकत जेतेपद मिळविले, तेव्हा पंडित यांना अश्रू आवरता आले नव्हते. आता चंद्रकांत मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आहेत आणि 23 वर्षांपूर्वी त्यांची जी इच्छा अपूर्ण राहिली होती, ती इच्छा यावर्षी त्यांनी पूर्ण केल्यावर यावेळीही ते भावूक झाले. पण यावेळी त्यांच्या डोळय़ात आनंदाश्रू होते.

मागील 2 वर्षांपूर्वी चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक बनले. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी संघाने त्यांना मोठी रक्कम दिली. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काही काळ मध्य प्रदेश संघ अपेक्षित प्रदर्शन करत नव्हता, ज्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. परंतु जसा-जसा वेळ गेला, तशी संघाच्या प्रदर्शनात सुधारणा दिसू लागली. संघातील काही खेळाडू अनुभवी होते, पण ते चंद्रकांत यांच्या रणनीतीमध्ये फिट बसत नसल्यामुळे त्यांच्यातील काही जणांना संघातून बाहेर केले गेले तर कही दिग्गज स्वतःहून संघातून बाहेर गेले.

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांमध्ये चंद्रकांत पंडित यांची गणना केली जाते. ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. संघातील सर्व खेळाडूंना मैदानात येताना स्वतःचा मोबाईल फोन एका ठिकाणी जमा करावा लागतो. सराव सत्र संपल्यानंतर खेळाडूंना त्यांचा मोबाईल माघारी दिला जातो. चंद्रकांत यांच्या मते मोबाईलमुळे खेळावर त्यांचे दुर्लक्ष होते.  मागच्या 6 वर्षांपासून मध्य प्रदेश संघ रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचू शकला नव्हता. पण यंदाच्या वर्षी जेतेपद पटकावत मध्य प्रदेशने कमाल केली आहे.

सर्फराजची 4 शतके आणि सर्वोत्तम धावसंख्या 275

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला, पण युवा खेळाडू सर्फराज खानने आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. मुंबईच्या या फलंदाजाने 2021-22 च्या रणजी ट्रॉफी हंगामात शानदार फलंदाजी साकारली. या मोसमात त्याने 6 सामन्यांच्या 9 डावात 982 धावा करत मालिकावीर पुरस्कार पटकावला.  या हंगामात सर्फराज खानची सर्वोच्च धावसंख्या 275 धावांची होती. यासह त्याने 4 शतके आणि पन्नास धावांचा टप्पा दोनदा पार केला. मध्य प्रदेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी सर्फराज खानने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले.

Related Stories

सर्फराज खानच्या नाबाद शतकाने मुंबईला सावरले

Patil_p

इजिप्तमधील टेनिस स्पर्धत ऋतुजा भोसले विजेती

Patil_p

सोप्या विजयासाठी मुंबईची 19 व्या षटकापर्यंत झुंज

Patil_p

आयसीसीकडूनही गंभीर दखल, घटनेचा तीव्र निषेध

Patil_p

सनरायजर्सचा पंजाब किंग्सवर विजय

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाचा सलग दुसरा पराभव

Patil_p
error: Content is protected !!