ऑनलाईन टीम / मुंबई :
ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक (mla ganesh naik)यांना कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. नेरूळ पोलीस (nerul police) ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी नाईकांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यामुळे नाईक यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता नाईक यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. कोपरखैरणे येथील घर आणि कार्यालय तसेच मुरबाडमधील फार्म हाऊसवर पोलिसांकडून नाईक यांचा शोध घेतला जात आहे.
दीपा चौहान या महिलेने गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. बलात्कार प्रकरणात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चार दिवस लोटल्यानंतरही गणेश नाईक यांना अटक न करण्यात आल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला आघाडीने आक्रमक आंदोलन केले होते. आमदार नाईक यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाईकांच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिले होते. नवी मुंबईचे पोलीस नाईकांचा शोध घेत असून, कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते.
दरम्यान, पीडित महिला न्यायालयीन लढाई पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलाने दिली आहे. नाईक यांची नवी मुंबई पोलिसांकडून कायदेशीर चौकशी सुरू झाली आहे. आमच्यामार्फत सर्व पुरावे सादर करण्यात आले असून आमच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला आहे. आता पुढे जाऊन आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. नाईक हे त्यावेळी मंत्री होते आणि महिलेवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे इच्छा नसताना ‘त्या’ नात्यात पीडित महिलेला भाग घ्यावा लागला. मात्र, आता आमचा लढा न्याय मिळवण्यासाठी असल्याची प्रतिक्रियाही वकिलांनी दिली.