लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये अत्याचार
वृत्तसंसथा/ रुडकी
उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्हय़ातील रुडकीमध्ये एक महिला आणि तिच्या 6 वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या महिलेला आणि तिच्या मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसविण्यात आले होते. रात्रीच्या वेळी ही महिला मुलीसोबत एका धार्मिक स्थळावरून परतत असताना सोनू नावाच्या व्यक्तीने त्यांना लिफ्ट दिली होती.
सोनू आणि त्याच्या मित्रांनी महिला आणि मुलीवर बलात्कार केला आणि एका कालव्यानजीक दोघांना उतरवून पळ काढला. महिलेने कशाप्रकारे तरी मध्यरात्री पोलीस स्थानकात पोहोचून स्वतःची आपबीती मांडली होती. कारमध्ये नेमके किती लोक होते हे महिलेला योग्यप्रकारे सांगता आले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. परंतु कारचालकाचे नाव सोनू असल्याचे तिने सांगितले आहे. महिला आणि तिच्या मुलीला रुडकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत दोघींवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.