सौंदर्यप्रसाधन कंपनीशी टायअप
दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने आता कॉस्मेटिक प्रॉडक्टच्या जगात बिझनेस वुमन म्हणून एंट्री केली आहे. उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सध्याचा काळ माझ्यासाठी सर्वात उत्तम होता असे तिने म्हटले आहे. रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसून येणार आहे. याचबरोबर ‘ऍनिमल’ चित्रपटात रणबीर कपूर तर ‘गुडबाय’ चित्रपटामध्ये ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे.
एका ब्युटी प्रॉडक्टसोबत भागीदारी केली आहे. उद्योगक्षेत्र एक वेगळेच जग असून ते अत्यंत रंजक आहे. एका महिलेला आर्थिक दृष्टय़ा स्वावलंबी असायला हवे. महिला आर्थिक दृष्टय़ा स्वावलंबी झाल्यास त्यांना एक वेगळी ओळख प्राप्त होते तसेच एक चांगले मनोबल प्राप्त होण्यास मदत होते. महिलांना स्वतःचे निर्णय घेण्यास मदत होते, असे माझे मानणे असल्याचे रश्मिका म्हणाली.
अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याची माझी इच्छा नव्हती. वडिलांच्या व्यवसायात भाग घेण्याची माझी इच्छा होती. परंतु नशिबात कलाकार होणे लिहिले होते. स्वतःचे शिक्षण पूर्ण केल्यावर वडिलांच्या उद्योगात भाग घेण्याचा माझा विचार होता. मॉडेलिंग केल्याने तेथूनच माझा प्रवास सुरू झाला. मला पहिल्या चित्रपटासाठी दीड लाखांचा चेक (धनादेश) मिळाल्यावर या रकमेचे करू काय हेच मला समजत नव्हते. घरी आईच्या हातात हा चेक दिल्यावर ती घाबरून गेली होती असे तिने सांगितले.