खानापूर अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अजब प्रताप : रेशन मिळविण्यासाठी वृद्धेचे हेलपाटे
वार्ताहर /चापगाव
खानापूर तालुक्मयातील कुप्पटगिरी येथील एका वृद्धेला जिवंतपणी मयत दाखवून त्या वृद्ध महिलेचे रेशनकार्ड रद्द करण्याचा प्रताप खानापूर अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या विभागाने केला आहे.
सदर वृद्ध महिलेचे नाव भाग्यश्री विष्णू पाटील (वय 70) असे असून वृद्ध महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून विभक्त असून यापूर्वी 540700156293 बीपीएल रेशन कार्ड होते. सदर बीपीएल रेशनकार्डनुसार त्या महिलेला रेशनही मिळत असे. परंतु 20 जानेवारी 2022 रोजी खानापूर अन्न व नागरी पुरवठा विभागाने सदर महिला मयत असल्याचे दर्शवून त्या महिलेचे रेशन कार्ड रद्द केले आहे.
सदर वृद्ध महिला गेल्या चार महिन्यापासून आपल्याला रेशन मिळावे यासाठी रेशन दुकानाला हेलपाटे घालत आहे. परंतु सदर महिलेला रेशन दुकानदाराने किवा अन्न व नागरी पुरवठा खात्याने समर्पक उत्तर दिले नाही. त्यामुळे तिने आपल्याला रेशन मिळत नसल्याची बाब ग्रा.पं. सदस्या पद्मश्री पाटील यांच्या निदर्शनाला आणून दिली. पद्मश्री पाटील यांनी सदर महिलेचे यापूर्वीचे रेशन कार्ड रद्द झाल्याची कारणमीमांसा शोधण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे तक्रार नोंदवली. व रेशनकार्ड रद्द का झाले? याचे कारण शोधले असता सदर वृद्ध महिला मयत असल्याचे दर्शवून कार्ड रद्द केल्याचे समजले.
यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्यातील हा आंधळा कारभार चव्हाटय़ावर आला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून अनेक लाभार्थींची रेशन कार्डे रद्द झाल्याच्या तक्रारी आहेत. बऱयाच लोकांना अंगठा न लागण्याचे कारण किंवा अन्य काही कारणे सांगून रेशन मिळत नाही. संबंधित विभागाकडून एखाद्या बीपीएल कार्डाचा नंबर वापरून दुसऱयाला रेशन देणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू!
शासकीय पातळीवर अनेक गैरव्यवहार उघडपणे होत आहेत. पण यावर कोणीही दाद मागत नाही. ग्रामपंचायत असो अथवा महसूल खाते असोत, अनेक गोरगरिबांवर अन्यायकारक प्रकार होत आहेत. सदर वृद्ध महिला ही अतिशय गरीब असून घरच्यांपासून विभक्त आहे. तीन महिने रेशनसाठी हेलपाटे घालत असतानाही तिला कोणीही आधार दिला नाही. शिवाय ती जिवंत असताना मयत दाखवून रेशन कार्ड रद्द का झाले? याचा छडा लावण्यासाठी आपण प्रयत्न करून त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
-पद्मश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्या