Tarun Bharat

विवेकनिष्ठ भावोपचार पद्धत (आरइबीटी)-2

दृष्टिकोनातील फरक बरेच बदल घडवतो हे आपण मागच्या लेखात पाहिले. विवेकपूर्ण विचार आपल्या जीवनाची गाडी योग्य ट्रकवरून पुढे जाण्यास मदत करतात. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अस्वस्थता निर्माण करणारा असेल तर तो बदलणे आवश्यक आहे. अन्यथा मानसिक अनारोग्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो. पुढील उदाहरणातून आपण ते समजून घेऊया..

त्या दिवशी माझी मैत्रिण सीमा अचानक घरी भेटायला आली. ती कमालीची अस्वस्थ दिसत होती. चेहरा पार कोमेजून गेलेला, थकलेली वाटत होती. तिला पाणी आणून दिलं आणि म्हटलं किती दिवसांनी आलीस. बरं झालं आलीस. आज भेट झाली. सीमा उसनं हसू आणत पाणी प्यायली आणि तिने माझा हात घट्ट पकडला. ‘काय झालं सीमा?’ ‘मला…मला तुझी खूप गरज आहे. प्लीज मदत कर. गेले दोन महिने मी खूप अस्वस्थ आहे. रात्र रात्र डोळय़ाला डोळा नाही.. सतत अस्वस्थता..’

‘अगं हो. पण काय झालं आहे की त्यामुळे तू एवढी अस्वस्थ आहेस?’ ‘काय सांगू, गेले सहा महिने माझे बाबा आजारी आहेत. खूप थकलेत. अलीकडे त्यांची तब्बेत अधिकच बिघडली आहे. मी आजही माझ्या बाबांशी खूप कनेक्ट आहे गं. बाबांना काही झालं तर? ते गेले तर मी ते दुःख कसं सहन करेन असं मला सतत वाटतं. त्यांची तब्बेत खूप नाजूक झाली आहे. दोन तीन वेळा जाऊन भेटून आले पण मुलांच्या शाळा परीक्षा यामुळे तिथेही जाऊन राहता येत नाही. माझे सासू-सासरेही वयस्कर आहेत. काय करावे हेच कळत नाही. हल्ली मोबाईलची रिंग वाजली तरी छातीत धडधडतं. मला वाटतं बाबांचं काही झालं नसेल? त्यांचे काही झाले तर ते परत कधीच दिसणार नाहीत. बालपणापासून त्यांनी खूप जपलं. छान लाडात वाढवलं, कित्ती कित्ती आठवणी आहेत गं..अचानक माणूस निघून जाण्यानं जी पोकळी निर्माण होते ती भरून कशी काढणार? बाबा आधार आहेत माझा. या अस्वस्थतेमुळे वाटतं मलाच काहीतरी होईल, मला ऍटॅक येईल. मग कशातच लक्ष लागत नाही गं माझं. सतत बाबाच डोळय़ासमोर येतात. मग विचार, अस्वस्थता, धडधड हे चक्र सुरूच. या विचारचक्राने पार दमलेय गं मी. खूप थकल्यासारखं होतं. मरगळ जाणवते.’

सीमाची समस्या माझ्या लक्षात आली. बाबांचे कधी ना कधी जाणे या दुःखद तरीही अटळ घटनेकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन अविवेकी, अवास्तव होता. तिला बालपणापासून वडिलांनी खूप जपले होते. तिच्यात तसा पूर्वीपासूनच आत्मविश्वास कमी होता. स्वतंत्रपणे विचार करणे, निर्णय घेणे यापासून ती लांबच होती. वडील गेले की आधार जाणार आणि मी राहूच शकणार नाही अशी समजूतच तिने करून घेतली होती. फोन वाजला की बाबा गेल्याचीच बातमी असणार हा तिचा विचार तिच्या दुःखाचे मूळ कारण बनला होता.

घरी दादा वहिनी तिच्या वडिलांची छान काळजी घेत होते. कोणतीही गैरसोय नव्हती. मी सीमाला म्हटलं, ‘अगं तुझा दादा वहिनी तुझ्या बाबांची उत्तम काळजी घेतात, कसलीही अनास्था नाही ही समाधानाचीच बाब नाही का? मुलगी म्हणून तुझ्या भावना मी समजू शकते. परंतु जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही कधी ना कधीतरी जाणारच आहे.’ मी बोलत होते परंतु सीमाचा चेहरा मख्खच होता. मला कळत होते की माझे बोलणे तिच्यापर्यंत म्हणावे तसे पोहचत नाही. तरीही मी बोलत राहिले. मी सीमाला म्हटलं. ‘सीमा ते सगळं राहू दे. मला सांग लग्न झाल्यापासून गेल्या बावीस वर्षात वडिलांना फोन झाला नाही असा एक तरी दिवस गेला का? वडिलांसोबत रोज किती वेळ बोलणं होतंय?’

सीमा-‘अगं कामाच्या व्यापात कित्येकदा फोन होत नाही. काही वेळा आठ आठ दिवसात बोलणं होत नाही. जेव्हा फोन करते तेव्हा पाच मिनिटं बोलणं होतं त्यांच्याजवळ.’ ‘बरं..म्हणजे त्या बोलण्याखेरीज तू राहू शकतेस हे तरी तुझ्या लक्षात येतंय का? सीमा तुला वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षापर्यंत बाबांचा आधार लाभलाय. यापुढेही ते असेपर्यंत लाभणारच आहे. पण तुझी मुलं लहान आहेत. तू स्वतःला मुलीच्या भूमिकेमधे न पाहता आई या भूमिकेतून पहा ना. तुला दोन मुलं आहेत. त्यांचा आधार तूच आहेस ना? तुझी तब्बेत चांगली असणं हे किती महत्त्वाचं आहे हे समजून घे. बदलू न शकणाऱया परिस्थितीचा स्वीकार कर. दादा वहिनी तिथे खंबीरपणे उभे आहेत याचा आनंद मान. वृद्धापकाळामधे बाबांचे हाल होत नाहीत. आपुलकीने कुणी करणारे आहेत हे केवढं मोठ्ठं आहे? मुलगी या भूमिकेतून बाहेर येऊन पत्नी, सून, आई आणि सजग शिक्षिका या भूमिकांचा विचार कर. पटतंय का बघ?’ आता मात्र सीमाचा चेहरा बदलला होता. ती आत्मविश्वासानं म्हणाली, ‘थँक्मयू गं. खूप मोठ्ठं ओझं उतरवलंस तू.

नंतरही सीमासोबत बरीच चर्चा झाली. काही ध्यानाशी निगडित व्यायामही तिला करायला सांगितले. काही दिवसातच तिच्यात अपेक्षित बदल झाला. पुढे चार पाच महिन्यांनी तिचे वडील गेले. परंतु अतिशय धीराने, न डगमगता त्या प्रसंगाला सीमा सामोरी गेली. दृष्टिकोन बदलला तर निश्चितच फरक पडतो. सीमाचे हे उदाहरण डॉ. एलीस यांनी सांगितलेल्या पंचसूत्रीत कसे बसते ते पाहूया.

1) घटना-मीराच्या वडिलांचे आजारपण.

2) विचार पद्धती-वडिलांचे जाणे भयंकर पोकळी निर्माण करणारे, मी या दुःखातून बाहेर पडूच शकणार नाही. या दुःखामुळे मलाच हार्टऍटॅक येणार.

3) घटनेचा भावनिक परिणाम व वर्तन-मीराला अस्वस्थ वाटणे, फोनच्या रिंगने धडधडणे, झोप न लागणे, सतत विचार सुरू राहणे.

4) स्वगताला आव्हान-वडिलांच्या आजारपणाबाबत मीराशी केलेली चर्चा, वडिलांच्या मृत्युकडे बघण्याचा मीराचा दृष्टिकोन कसा अवास्तव, अविवेकी आहे या गोष्टीची तिला करून दिलेली जाणीव. वडिलांच्या अनुपस्थितीत आजवर घेतलेले अनेक निर्णय. ते नसतानाही ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते याविषयी तिच्या मनात निर्माण केलेला विश्वास, वडिलांची मुलगी या भूमिकेपेक्षा मुलांची आई, पत्नी, सून या भूमिकांना दिलेले प्राधान्य यामुळे मीराच्या मनात वडिलांचे आजारपण, त्यांचे निघून जाणे या घटनेकडे निराळय़ा दृष्टीने पाहण्याची निर्माण झालेली अंतदृष्टी.

5) उपचारांचा परिणाम-मीरा मध्ये आलेला आत्मविश्वास, तिला लाभलेले मानसिक, शारीरिक स्वास्थ्य.

एखाद्या घटनेसंदर्भात आपण जे स्वगत बोलतो ते इतके झटकन आणि सहजतेने बोलले जाते की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. परंतु हे स्वगत माणसाची अस्वस्थता टिकवून ठेवण्याचे काम मात्र करते. स्वगताकडे लक्ष असणे खूप गरजेचे आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.

-ऍड. सुमेधा संजीव देसाई

Related Stories

जगात काय चाललंय

Patil_p

कोरोना : ही वाट दूरवर जाते

Tousif Mujawar

शोध भारतीयांचे…

Patil_p

अंतर्यामी नारायणाचे ध्यान करणाऱया भक्ताला सिद्धी प्राप्त होतात

Patil_p

राज्याला राजकीय स्थैर्य मिळु दे !

Patil_p

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ (27)

Patil_p