मिरजोळीसह अनेक गावांतील आठवडाभरातील घटना, शेकडो जनावरांना लागण, पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरणावर भर
चिपळूण प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून जनावरांना लम्पी रोगाने ग्रासले आहे. शेकडो जनावरांना त्याची लागण झाली असून तालुक्यात मिरजोळीसह अन्य गावांमध्ये गेल्या आठवडाभरात 10 जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत असून पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरणावर भर देण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठिकठिकाणी जनावरांना लम्पी रोगाची लागण झाल्याचे दिसत आहे. बऱयाच भागात अनेक गुरे दगावली आहेत. त्यामुळे हा रोग जिल्ह्यात फैलावू नये म्हणून जिल्हा पशुवैद्यकीय विभाग आधीपासूनच अलर्ट झाला आहे. त्यानुसार ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली. मात्र सुरूवातीला कोठेही तितकीशी जनावरे या रोगाला बळी पडली नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तपासणी व लसीकरण सुरू ठेवण्यात आले होते.
असे असताना काही दिवसांपूर्वी कोकरे, कोसबी आदी गावांत लम्पीसदृश्य जनावरे आढळून आली होती. आता या रोगाचा फैलाव झाला आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील शेकडो जनावरे या रोगाने त्रस्त झाली आहेत. मिरजोळीसह काही गावांतील 10 जनावरे आतापर्यंत दगावली आहेत. त्यातील काही जनावरांच्या पशुवैद्यकीय विभागाकडे नोंदी झाल्या आहेत, तर काही शेतकऱयांनी परस्पर जनावरांना पुरले आहे. मात्र हा रोग फैलावताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.