मुख्य संशयिताला 2 दिवस पोलीस कोठडी : अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी
प्रतिनिधी/रत्नागिरी
ठाणे येथील व्यापारी किर्तीकुमार कोठारी यांच्या खूनाच्या दिवशी संशयित भूषण खेडेकर यांने घातलेली हाफ पॅन्ट अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. खूनाच्या तपासात संशयितांनी परिधान केलेले कपडे अत्यंत महत्वाचा पुरावा असल्याने ते कपडे शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. खूनाच्या घटनेला आता 12 दिवस होवून गेले असताना ही हाफ पॅन्ट कुठे व कुणी गायब केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
शनिवारी संशयितांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता पोलिसांनी न्यायालयापुढे सांगितले की, मुख्य संशयित भूषण खेडेकर याने परिधान केलेली हाफ पॅन्ट अद्याप जप्त करण्यात आलेली नाही. तसेच कोठारी यांच्याकडील रक्कम देखील जप्त करावयाची आहे. यासाठी संशयित आरोपीची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने भूषण खडेकर याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर अन्य दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
हे ही वाचा : मुंबईतील व्यापारी खून प्रकरण : गळा आवळलेल्या दोरीचा पोलिसांना शोध
19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होत़ा आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आह़े या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलपसाद चौगुले (39, मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आहे.