Tarun Bharat

रत्नागिरी जिल्हा जलमय; रस्ता वाहतुकीला ब्रेक, रेल्वे सुरूच

लांजात रेकार्डब्रेक पाऊस; मुंबईला जाणारी वाहने वळवली देवधेमार्गे; रत्नागिरी, खेड, मंडणगडला तडाखा

Advertisements

रत्नागिरी प्रतिनिधी

जिल्ह्यात रविवारपासून सोमवारी सकाळपर्यंत 24 तासांत आभाळ फाटल्यागत वृष्टी झाली. त्यामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान लांजा तालुक्यात 290 मीमी इतकी नोंद झाली आहे. रविवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी पहाटेपासून रौद्र रूप धारण केले आहे. तुफानी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अवघा जिल्हा जलमय झाला. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील जनतेला प्रशासनाने सतर्क केले आहे.

लांजा तालुक्यात पावसाने कहर केला असून काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक देवधे-दाभोळ मार्गे तर गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली-दाभोळे-लांजामार्गे वळवण्यात आली आहे. पूर ओसरल्यास रात्री उशिरा मुंबई – गोवा महामार्ग सुरळीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. लांजात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मुचकुंदी, काजळी, नावेरी या मुख्य नद्यांसह उपनद्यांनीही पातळी ओलांडली आहे. आंजणारी येथील काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सोमवारी सकाळी 11 पासून दिवसभर येथील ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. चिपळूण शहरात पावसाचा जोर कायम आहे मात्र पुराचा धोका टळला आहे. नाईक कंपनी, वडनाका, मिरजोळी येथे शिरलेले पुराचे पाणी ओसरले आहे. नगर परिषदेने गटारे साफ केल्याने रस्तेही मोकळे झाले आहेत. यावर्षी रविवारी तब्बल 205 मि. मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

मंडणगडातील तालुक्यात मुसळधार पावसामुळे आंबवणे बुद्रूक येथील धायकडा या ठिकाणी रविवारी रात्री दरड कोसळून मातीचा प्रचंड भराव रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे रात्री वस्तीस गेलेली एस.टी. अडकून राहिली. रस्त्यावरील भराव बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीद्वारे काम सुरु केले आहे. नदी-नाले व ओढ्यांना पूर आल्याने भारजा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

खेडमधील जगबुडी नदीने सायंकाळी उशिरा धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी मटण -मच्छी मार्केटमध्ये घुसले. बाजारपेठेत पाणी घुसण्याच्या शक्यतेने नदीकाठच्या रहिवाशांसह व्यापाऱ्यांच्या उरात धडकी भरली. नगर प्रशासनानेही सायरन वाजवत नागरिकांना सतर्प केले. राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून पुराच्या पाण्याने जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत धडक दिली आहे. राजापूर शिळ चिखलगाव रस्ता, शहरातील बंदरधक्का, शिवाजीपथ, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related Stories

किल्ले सिंधुदुर्गला २१ हजार पर्यटकांची भेट

NIKHIL_N

दाटले सर्वत्र धुके-धुके..

NIKHIL_N

बाप्पा चालले गावाला…चैन पडेना आम्हाला!

Patil_p

बांद्यात फोटो स्टुडिओत घुसून माकडांचा धुडगूस

NIKHIL_N

बॉक्सेल ब्रिजचा कोसळलेला भाग ‘ग्रीन नेट’ने झाकला

NIKHIL_N

आपत्कालीन डय़ुटीवेळी टाळाटाळ नको!

NIKHIL_N
error: Content is protected !!