पोलिसांनी सापळा रचून पकडला कंटेनर; तब्बल 891 बॉक्स गोव्याहून नाशिक दिशेने; चालक ताब्यात, कंटेनरसह दारु असा 34 लाखाचा मुद्देमाल जप्त
चिपळूण प्रतिनिधी
तब्बल 24 लाख रूपये किंमतीची गोवा बनावटीची बेकायदा दारु कंटेनरमधून नाशिकच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या स चिपळूण पेलिसांनी मंगळवारी रात्री 1.45 च्या सुमारास सापळा रचून मुंबई-गोवा मार्गावरील कळंबस्ते याठिकाणी पकडली. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेतले असून या कंटेनरमध्ये 891 दारुचे बॉक्स होते. या दारुसह 10 लाखाचा कंटेनर असा एकूण 34 लाख 45 हजार 72 रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
बाबासाहेब सुखदेव बुदवंत (44, मुळशी, ता. हवेली, जिल्हा पुणे) असे ताब्यात घेतलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. त्याच्याच मालकीचा हा कंटेनर आहे. त्याने 2019मध्ये हा कंटेनर घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन सण, उत्सव्यादरम्यान राजरोसपणे गोवा बनावटीची दारुची वाहतूक होत असल्याची ओरड होत होती. अशातच अधून-मधून पोलिसांसह उत्पादन शुक्ल विभागाने धडक कारवाई केली आहे. यामुळे बेकायदा गोवा बनावटीची वाहतूक थांबली असतानाच पुन्हा एकदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला आहे. गोव्याहून नाशिकाच्या दिशेने ही दारु घेऊन जाणारा हा कंटेनर चिपळूणहून पुढे जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी महामार्गावरील शहरापासून काही अंतरावर असलेल्या कळंबस्ते याठिकाणी मंगळवारी मध्यरात्री 1.55 च्या सुमारास सापळा रचला. दारु वाहतुकीचा हा कंटेनर येताच त्यास पोलिसांनी थांबवले असता कंटेनर चालकाने पोलिसांना पहिल्यांदा उलटसुलट माहिती दिली. या कंटेनरचे सील तोडले असता त्यात तब्बल 24 लाख रूपये किंमतीचे 891 दारुचे बॉक्स पोलिसांना आढळले. यात 198 बिअरचे व 48 व्हीस्कीचे बाॅक्स तसेच अन्य दारुच्या बॉक्सचा समावेश आहे. पोलिसांनी दारुसह 10 लाख रूपये किंमतीचा कंटेनर जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक रीक्षक रत्नदीप साळोखे, पोलीस हेड काॅन्स्टेंबल पप्या चव्हाण यांच्यासह 7 ते 8 पोलिसांच्या पथकाने केली. दरम्यान, एवढ्या मोठ्या किंमतीची गोवा बनावटीची दारु नेमकी कोणत्याठिकाणी पाठवण्यात येत होती, तसेच तालुक्यासह जिल्ह्यातील कोणाचा यात संबंध आहे का, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.