8 लोकनियुक्त 1 स्वीकृत नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पाठिंबा: आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शुकवारी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
प्रतिनिधी/मंडणगड
येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शहरातील शिवसैनिकांच्या शहर विकास आघाडीतील 8 लोकनियुक्त 1 स्वीकृत अशा 9 नगरसेवकांनी शुकवारी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आपण शिंदे गटात सामील होत असल्याचे जाहीर केले. याला नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला आहे. या भेटीसाठी गटनेते जाधव यांच्यासह नगरसेविका वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, सेजल गोवळे, योगेश जाधव, नीलेश सापटे, आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभिळकर, स्वीकृत नगरसेवक प्रवीण जाधव यांच्यासह उपशहर प्रमुख नीलेश गोवळे, चेतन सातोपे, प्रतीक पोतनीस, विनीत रेगे, नरेश बैकर आदी मुंबईला गेले होते.
शहर विकास आघाडीच्या नावाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या या आघाडीच्या हातातून सत्ता थोडक्यात निसटल्याने अनुकूल जनमत असतानाही विरोधात बसावे लागले आहे. महाविकास आघाडी व शहर विकास आघाडी यांचे प्रत्येकी आठ नगरसेवक निवडून आले व चिठ्ठीच्या मदतीने निवडून आलेल्या नगरसेविकेने महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिल्याने शहर विकास आघाडी सत्तेपासून वंचीत राहिली.
राज्यातील सध्याचे सत्तांतराचे परिणाम ग्रामीण भागावरही होत असल्याने सध्या सत्तेत असलेल्या महाविकास
आघाडीत चलबिचल सुरु आहे. त्यातच शहर विकास आघाडीने शिंदे गटाचे अधिकृतपणे समर्थन केल्याने शहर विकास आघाडीचे समर्थक नगरसेवक राज्यातील नवीन सत्ताकारणाचे समर्थक झालेले आहेत, तर महाविकास आघाडीतील विद्यमान सत्ताधाऱ्यांना आगामी कालखंडात राज्याकडून आपणास कोणतीही विशेष मदत होणार
नसल्याची चुणूकही मिळालेली आहे.
हे ही वाचा : आम्ही कायदेशीर नामांतर करणार- मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची ग्वाही
दापोलीतील दोन अपक्ष नगरसेविकांचा शिंदे गटात प्रवेश
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून उभे राहून निवडून आलेल्या दोन अपक्ष नगरसेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेत त्यांच्या गटात प्रवेश केला.
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व ए बी फॉर्म दळवी गटाकडे गेल्यामुळे आमदार योगेश कदम यांच्या गटातील उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यामध्ये कृपा भाग व प्रीती शिर्के या दोन नगरसेविकांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान, दापोलीतील नगरसेविकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे नगरपंचायतीमध्ये देखील शिवसेनेला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.