हाडे चेचून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न : पोलीस तपासात उलघडा
प्रतिनिधी/रत्नागिरी
swapnali sawant murder case : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात निर्दयीपणाचा कळस झाल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावताना पती सुकांत याने अर्धवट जळलेली स्वप्नालीची कवटी फोडून तिचे बारीक तुकडे केले. तर स्वप्नाली हिची जळलेली हाडेही चेचून बारीक करण्याचा पयत्न मुख्य संशयित सुकांत याने केला. यावरून पती सुकांत सावंत याच्या मनात स्वप्नाली हिच्याबद्दल पराकोटीचा द्वेष असल्याचे दिसून येते.
1 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या किचनमध्ये गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत ऊर्फ भाई गजानन सावंत (47), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (रा. सर्व सडामिऱ्या रत्नागिरी) यांना अटक केली. तीनही संशयितांना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांकडून पोलीस गुन्ह्याचा अत्यंत कसून तपास करत आहेत.
स्वप्नाली सावंत हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना भाई सावंत व अन्य दोन्ही संशयितांची पुरती दमछाक झाली. स्वप्नाली सावंत यांचा खून केल्यानंतर 1 सप्टेंबरच्या रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू झाले. यावेळी सुकांत सावंत व दोन्ही साथीदारांनी पेंढा टाकून पेट्रोलचा वापर करून मृतदेह जाळला. असे असतानाही स्वप्नाली हिची हाडे तशीच राहिली होती. दरम्यान अर्धवट जळलेली स्वप्नाली हिची कवटी भाई सावंत याने अन्य अवजाराचा वापर करून फोडली. तर मोठी हाडे कुणाच्या हाती लागू नयेत यासाठी चेचली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
घटनेच्या रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत भाई सावंत व त्याचे दोन्ही साथीदार हे पुरावा नष्ट करण्यासाठी जीवाचे रान करत होते. दिवस उजडायच्या आत त्यांना कोणताही पुरावा मागे ठेवायचा नव्हता. यावेळी त्यांनी हाडांचे बारीक झालेले तुकडे हे कचऱ्यातून जवळच्या रानात टाकून दिले. तर अन्य मोठे तुकडे हे समुद्राच्या खाजण परिसरात फेकले. यासाठी त्यांनी 18 पिशव्यांचा वापर केला होता, अशी कबुली पोलिसांपुढे दिलेल्या जबाबात संशयितांनी दिली.
पोलिसांनी स्वप्नाली सावंत हिच्या घराच्या परिसरातील झाडाझडती व तपासकामात कचऱ्यातून टाकण्यात आलेले हाडांचे तुकडे सर्वप्रथम पोलिसांच्या हाती लागले. यानंतर समुद्राच्या खाजणात टाकलेले मृतदेहाची हाडेही पोलिसांना आढळून आली. खून तपासात हा सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती आला. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल हाडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली जाणार आहेत. तसेच स्वप्नाली सावंत हिच्या मुलीचा डीएनए घेतला जणार असल्याचेही सांगण्यात आले.
स्वप्नाली हिच्या खूनानंतर तिचा मोबाईल संशयित आरोपी यांनी जवळच्या विहिरीत टाकल्याचे समोर आले आहे. दरम्यान विहिरीला असलेले पाणी व सातत्याने पडत असलेल्या पावसाने मोबाईल मिळवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. लवकरच हा मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच तीनही आरोपी यांचे मागील 6 महिन्याचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून घेतले जात आहेत. त्यानुसार अन्य काही दुवा खून प्रकरणात आहे का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.