Tarun Bharat

Ratnagiri : जिल्ह्यातील गावच्या कारभाऱ्यांचा आज लागणार फैसला

रविवारी झालेल्या 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान; राजकीय पक्षांची, स्थानिक नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला

रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात 36 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी झालेल्या मतदानात येणाऱ्या गावच्या कारभाऱ्यांचा कौल मतपेटीबंद झाला. या झालेल्या मतदानात सरासरी 60 टक्के मतदान झाले. सध्या राजकीय उलथापालथीमुळे गावपातळीवरही पक्षांमध्ये गटा-तटाची दुफळी माजली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणत्या गटांना मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. तर मतदारांनी केलेल्या मतदानाचा आज सोमवारी निकालाद्वारे फैसला लागणार असून त्यातून गावचे कारभारी कोण, हे समोर येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील 15 ग्रामपंचायतीच्या यापूर्वीच निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यात चिपळूण तालुका वगळता उर्वरित तालुक्यांतील 36 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. विशेषत: ठाकरे गट आणि महाविकास आघाडीविरोधात भाजप आणि शिंदे गट अशी लढत होताना दिसत आहे. या निवडणुकीत जरी पक्षीय चिन्हांचा वापर नसला तरी ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रविवारी सकाळी शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात होऊन मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा फारसा प्रतिसाद नव्हता. पण त्यानंतर सकाळी 10 वाजल्यानंतर मतदारांनी मतदानासाठी केंद्रावर गर्दी केली. जिल्ह्यात दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी उशिरानंतर अनेक ठिकाणी मतदानासाठी नागरिकांना गर्दी केलेली दिसली. त्यामुळे सायंकाळनंतर मतदानात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. या झालेल्या जिल्हाभरातील मतदानाचा निकाल आज सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यातून गावागावांतील कारभारी कोण, याचा फैसला लागणार आहे.
जिल्ह्यात प्रथमच चिपळूण तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना आलेले यश महत्वपूर्ण मानले जात आहे. पक्षीय मतभेद बाजूला टाकून गावविकासासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

Related Stories

चाकरमान्यांना घेऊन पहिली बस राजापुरात दाखल

Patil_p

रिफायनरीसाठी भव्य मोर्चा काढणार!

Patil_p

बचतगटाद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणार – आ. योगेश कदम

Archana Banage

‘ऑरेंज अलर्ट’ मध्ये जिल्हय़ात धुवाँधार

Patil_p

साई रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांना न्यायालयाचे तपासाचे आदेश

Patil_p

जिल्हय़ात कोरोनाबाधितांचा उच्चांक

Patil_p