महिलेच्या डोक्यावर घाव घालून टाकले पाण्याच्या टाकीत
देवरुख प्रतिनिधी
देवरूख क्रांतीनगर येथे सोन्याच्या दागिन्यांसाठी 80 वर्षीय वृध्द महिलेचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. खून केल्यानंतर या महिलेचा मृतदेह बिल्डींगच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी, देवरूखचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी दिवसभर घटनास्थळी होते. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबत दीपक दत्तात्रय संसारे याने फिर्याद दिली. शारदा दत्तात्रय संसारे असे निघृण खून करण्यात आलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. देवरूख कांतीनगर येथील बिल्डिंगमध्ये दीपक संसारे हा आपली आई शारदा संसारे यांच्यासह वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी 9.30 वाजता दीपक संसारे हा आईला सांगून कामानिमित्त बाहेर पडला. दुपारी 1 वाजता दीपक पुन्हा घरी आला असता खोलीच्या दरवाजाला कुलुप लावलेले दिसले. दीपक याने आईचा शोध घेतला असता ती दिसून आली नाही. दुपारी 2 च्या सुमारास दीपक याने सहकाऱ्यांच्या साथीने दरवाजाचे कुलुप तोडले.
दीपक याने जेवण करून पुन्हा आई शारदा यांचा शोध सुरू केला. दरम्यान रात्री 8 च्या सुमारास दीपक हातपाय धुण्यासाठी नळानजीक केला. यावेळी नळाला लाल रंगाचे पाणी आले. यामुळे दीपक याने सहकाऱ्यांच्या साथीने टेरेसवरील असलेल्या टाकीची पाहणी केली. यावेळी टाकीमध्ये साडी तरंगताना दिसली. पाहणी केली असता आईचा मृतदेह दीपकच्या दृष्टीस पडला. या बाबतची खबर दीपकने तत्काळ देवरूख पोलीस ठाण्यात दिली. यानुसार पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी भेट देत वस्तूस्थितीची पाहणी केली.
शारदा संसारे यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी त्यांच्या गळ्यातील माळ, हातातील पाटल्या, कानातील कुडी गायब असल्याचे निदर्शनास आले. तसेच डोक्यावर घाव घातल्याने जखम झाल्याचे दिसले. सोन्याचे दागिने चोरीच्या उद्देशाने शारदा संसारे यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी मंगळवारी सकाळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. हे श्वान बिल्डिंग परिसरातच घुटमळले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे डोमणे, भागणे, कांबळे, चाळके उपस्थित होते. देवरूख ग्रामीण रूग्णालयात शारदा संसारे यांच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या खळबळजनक घटनेपकरणी अज्ञाताविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम 302, 201, 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत. भरदिवसा शारदा संसारे यांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पर्दाफाश करणे हे पोलीस यंत्रणेसमोर आवाहन आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण, याकडे देवरूखवासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.