ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्राचाळ घोटाळा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेहिशेबी पैसा चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवल्याचा धक्कादायक खुलासा पत्राचाळ घोटाळय़ातील प्रमुख साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीसमोर केला आहे.
गोरेगावातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत मागील 53 दिवसांपासून आर्थर रोड तुरंगात आहेत. गेल्या आठवडय़ात ईडीने त्यांच्यावर पुरवणी दोषारोपपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्रात पाटकर यांचा जबाब जोडण्यात आला आहे. राऊत यांनी बेहिशेबी पैसा चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवला असल्याचा खुलासा पाटकर यांनी केला आहे. राऊत यांनी बेहिशेबी पैसा त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांच्या खात्यात वळवला.
अधिक वाचा : शिवसेना म्हणजे पवारांच्या पिंजऱ्यातील मांजर, मनसेची बोचरी टीका
राऊत यांनी राऊटर्स एन्टरटेन्मेंट एलएलपीची स्थापना केली होती. या कंपनीने ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती केली. या कंपनीत त्यांनी बेहिशेबी पैसा वळवला. जानेवारी 2015 मध्ये ‘बाळकडू’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न करता या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तरीही या चित्रपटाने 60 लाखांचा नफा कमावला. या चित्रपटाच्या निर्मितीत राऊत यांचे कोणतेही योगदान नव्हते. तरीही त्यांनी माझ्याकडून त्यांच्या नावे 50 लाखांचा धनादेश घेतला. 2021 मध्ये राऊत यांनी एक मद्य कंपनी घेतली. या कंपनीतही त्यांनी नातेवाईकांच्या नावाने बेहिशेबी रक्कम गुंतवली, असेही पाटकर यांनी ईडीच्या जबाबात सांगितले.