वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील ला नुसिया येथे सुरू असलेल्या आयबीएच्या पुरुष आणि महिलांच्या युवा विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची महिला मुष्टियोद्धी तसेच आशियाई युवा स्पर्धेतील विद्यमान विजेती रविनाने 63 किलो वजनगटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत रविनाने 63 किलो वजनगटातील झालेल्या लढतीत हंगेरीच्या व्हेर्गा रोझीचा एकतर्फी पराभव केला. त्याचप्रमाणे भारताची कुंजाराणी देवीने 60 किलो वजनगटात शेवटच्या आठ स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. कुंजाराणी देवीने स्पेनच्या मारियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात भारताच्या मोहितने 86 किलो वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. लिथुनियाचा त्याचा प्रतिस्पर्धी थॉमस लिमानेसला दुसऱया फेरीतच अपात्र ठरविण्यात आल्याने मोहितला उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली. 71 किलो वजनगटात भारताच्या साहिल चव्हाणने उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना अझरबैजानच्या डॅनियलचा 5-0 असा पराभव केला. भारताच्या निखिल आणि हर्ष यांना त्यांच्या वजनगटात प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत रविवारी तीन महिला स्पर्धकांसह भारताचे नऊ स्पर्धक उपउपांत्यपूर्व फेरीत लढत देतील.