ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून, कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 11040 मतांनी विजय मिळविला. त्यांना 72599 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. रासने यांच्या पारडय़ात 61771 मते पडली. या यशामुळे तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात पंजाला ‘हात’ मिळाला आहे.
कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात दुरंगी लढत झाली होती. ही जागा कायम राखण्यासाठी भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील भाजपाचे सर्व नेते येथे ठाण मांडून होते. मात्र, साम, दाम, दंड, भेद अशी सर्व आयुधे वापरूनही कसब्यात कमळ फुलविण्यात अपयश आले. पहिल्या फेरीपासूनच धंगेकर आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर हेमंत रासने रवींद्र धंगेकर यांच्याशी चुरस करताना दिसून आली. मात्र, धंगेकर यांनी पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली आणि दणदणीत विजय मिळवला. धंगेकर यांनी 11040 मतांनी भाजपच्या रासने यांना धूळ चारली.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. 26 फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं.