केएल राहुलचे ‘डिमोशन’, भुवनेश्वर, रहाणे, इशांत ‘बाहेर’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयने रविवारी क्रिकेटपटूंच्या मध्यवर्ती कराराची घोषणा केली असून अष्टपैलू रवींद्र जडेजाला ए प्लसमध्ये बढती मिळाली आहे तर अक्षर पटेलला ए श्रेणीमध्ये बढती मिळाली आहे.
34 वर्षीय जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेत संयुक्त मालिकावीराचा मानकरी ठरला होता. त्याच्यासह एकूण चार खेळाडूंना नव्या करारात ए प्लस श्रेणीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह यांच्यासह स्थान मिळाले आहे. आघाडीचा फलंदाज केएल राहुल याची पदावनती झाली असून त्याला आता बी श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. खराब प्रदर्शनाचा त्याला फटका बसला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांना मात्र करारातून वगळण्यात आले असून एकूण 26 क्रिकेटपटूंना चार गटात स्थान देण्यात आले आहे. ए प्लसला वार्षिक 7 कोटी, ए श्रेणीला 5 कोटी, बी श्रेणीला 3 कोटी व सी श्रेणीला 1 कोटी रुपये करारापोटी दिले जातात.
भुवनेश्वर, इशांत व रहाणे या अनुभवी खेळाडूंना करारातून वगळण्यात आले आहे, याचा अर्थ त्यांना यापुढे राष्ट्रीय संघात स्थान मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. स्पिन अष्टपैलू अक्षर पटेलला मात्र फलंदाजीतील कामगिरी उपयोगी पडली असून त्याला ए श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. यष्टिरक्षक केएस भरत यालाही पहिल्यांदाच मध्यवर्ती करारात सामील करून घेण्यात आले असून त्याला सी गटात स्थान मिळाले आहे. कार अपघातात गंभीर जखमी झालेला यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला ए श्रेणीमध्येच ठेवण्यात आले असून याच श्रेणीत हार्दिक पंडय़ा, आर.अश्विन, मोहम्मद शमी यांचाही समावेश आहे.
बी श्रेणीत एकूण सहा जणांचा समावेश असून त्यात चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल यांचा समावेश आहे. सी श्रेणीत 11 खेळाडू असून उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, इशान किशन, दीपक हुडा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत यांचा समावेश आहे.
जे खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये निश्चित खेळणारे आहेत त्यांचा इलाईट ए प्लस श्रेणीत समावेश आहे. कसोटी व वनडेमध्ये निश्चित खेळणाऱयांना ए गटात, मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी ज्यांचा विचार केला जातो, त्यांना बी गटात तर तीनपैकी एका प्रकारासाठी ज्यांचा विचार केला जातो, त्यांना सी गटात सामील करण्यात आले आहे.