Tarun Bharat

रयत कारखान्याची निवडणूक अखेर बिनविरोध

वार्ताहर/ उंडाळे 

कराड तालुक्यातील शेवाळवाडी (म्हासोली) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक विद्यमान चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली अखेर बिनविरोध झाली. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधी गटाने उर्वरित 14 जागांवरील अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

रयत साखर कारखान्याची स्थापना 1996 साली माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी केली. कारखान्याच्या स्थापनेनंतर 25 वर्षांनी प्रथमच विद्यमान चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व त्यांचे चुलत बंधू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ऍड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांच्यामध्ये ही निवडणूक लागली होती. 21 जागांसाठी सत्ताधारी गटाकडून 24, तर विरोधी गटाकडून 32 अर्ज भरण्यात आले होते. यामुळे निवडणूक होणारच असे चित्र होते. मात्र उमेदवार छाननीत विरोधी गटाचे सहा अर्ज अपात्र झाल्याने उदयसिंह पाटील गटाच्या सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या. येथेच त्यांनी अर्धी निवडणूक जिंकली होती.

यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक पुणे यांच्याकडे राजाभाऊ पाटील गटाने अपात्र उमेदवारीबाबत अपिल दाखल केले होते. हे अपिलही फेटाळण्यात आल्याने व त्याच दिवशी कोळे गटातून सुंदर पुजारी (धामणी) यांनी अर्ज माघार घेतल्याने उदयसिंह पाटील गटाच्या सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यातच उंडाळे येथील स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील नागरी पतसंस्थेची प्रथमच या दोन चुलत भावांमध्ये निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत उदयसिंह पाटील गटाने एकतर्फी विजय मिळवल्याने रयत कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, अशी चर्चा सभासदांमध्ये सुरू होती.

उर्वरित 14 जागांसाठी अर्ज शिल्लक राहिलेले राजाभाऊ पाटील गट काय भूमिका घेणार ही चर्चा असतानाच अर्ज माघारीचा एक दिवस शिल्लक असताना राजाभाऊ पाटील गटाने 14 जागांवरील सर्व अर्ज माघार घेतले. त्यामुळे अखेर रयत कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले. बिनविरोध संचालक मंडळामध्ये विद्यमान चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील यांच्यासह जुन्या-नव्या 21 चेहऱयांचा समावेश आहे. शेवाळेवाडी गट क्रमांक 1 मधून बाजीराव मारूती शेवाळे (शेवाळेवाडी, म्हासोली), परशुराम बंडू शिंदे (ओंड), पंजाबराव हंबीरराव देसाई (काळगाव). उंडाळे गट क्रमांक 2 मधून उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळे), जयवंतराव माणिकराव मोहिते (बेलवडे बुद्रुक), जयवंत श्रीपती बोंद्रे (कासारशिरंबे). कुंभारगाव गट क्रमांक 3 मधून ऍड. शंकरराव वसंतराव लोकरे (येरवळे), अर्जुन उदयसिंह पवार (चचेगाव), प्रशांत भगवानराव पाटील (कुंभारगाव), कोळे गट क्रमांक 4 मधून शेखर संभाजी देशमुख (कुसूर), आनंदराव तात्यासो पाटील (धामणी), रमेश सर्जेराव चव्हाण (कोळे). तांबवे गट क्रमांक 5 मधून प्रदीप जालिंदर पाटील (तांबवे), हिम्मतराव हिंदुराव पाटील (पश्चिम सुपने), आप्पासो विष्णू गरूड (येणके). सोसायटी मतदारसंघातून आत्माराम लक्ष्मण देसाई (आणे). महिला प्रतिनिधी गटातून शालन तुकाराम पाटील (जखिणवाडी), विजया सर्जेराव माने (विंग). अनुसूचित जाती जमाती गटातून शशिकांत जगन्नाथ साठे (टाळगाव). इतर मागास प्रवर्ग गटातून जगन्नाथ दत्तात्रेय माळी (नांदगाव). भटके विमुक्त गटातून तुकाराम मारूती काकडे (धोंडेवाडी) या 21 जणांचा बिनविरोध संचालक मंडळामध्ये समावेश आहे.

निवडणूक बिनविरोध झाल्याने रयत संघटनेचे कार्यकर्ते, सभासद यांनी फटाके वाजवून, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. बिनविरोध निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील यांचे सभासद शेतकऱयांनी अभिनंदन केले.

Related Stories

मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

किरीट सोमय्या जाणार बुधवारी जरंडेश्वरवर

Patil_p

मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच सोमय्या, पडळकर यांना अटक

datta jadhav

साताऱयात दुचाकीस्वारांवर कडक कारवाई

Patil_p

तर एमपीएससी विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन – सदाभाऊ खोत

Archana Banage

जंबो कोविड सेंटरमधील प्रवेश पारदर्शी होणार

datta jadhav