वृत्तसंस्था/ पॅरीस
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय सांघिक बिली जीन किंग चषक टेनिस स्पर्धेत अमेरिकेने युक्रेनला अंतिम स्पर्धेपासून रोखले. शनिवारी झालेल्या लढतीत अमेरिकेने युक्रेनचा 3-2 असा पराभव करत अंतिम स्पर्धेत स्थान मिळविले.
अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील या लढतीत युक्रेनच्या येस्ट्रेमेस्का आणि कॅटरिना झेवेस्का यांनी आपले एकेरीचे सामने जिंकून युक्रेनला 2-2 असे बरोबरीत नेले. या लढतीमध्ये पहिले दोन्ही एकेरी सामने अमेरिकेने जिंकून युक्रेनवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर दुहेरीच्या निर्णायक सामन्यात अमेरिकेच्या आशिया मोहम्मद आणि जेसिका पेगुला या जोडीने अमेरिकेच्या येस्ट्रेमेस्का आणि किचनॉक यांचा 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला. येत्या नोव्हेंबरमध्ये प्राग्वे येथे अंतिम स्पर्धा होणार आहे. पोलंडने या स्पर्धेत अंतिम टप्पा गाठला आहे. जर्मनीने कझाकस्तानवर विजय नोंदविला. त्याचप्रमाणे इटलीने फ्रान्सवर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, स्लोव्हाकिया यांनी यापूर्वीच प्रवेश केला आहे. युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे माजी विजेत्या रशिया आणि बेलारूस यांची या स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे.