पुणे/ वृत्तसंस्था
येथील गहुंजे स्टेडियमवर आयपीएल साखळी सामन्यात 13 धावांनी विजय संपादन करणाऱया आरसीबीला आणखी एक लाईफलाईन मिळाली असून याचवेळी सातवा पराभव पत्करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ ‘एक्झिट’च्या दारात फेकला गेला आहे. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबीने महिपाल लोमरोर (27 चेंडूत 42), विराट (30), प्लेसिस (38) यांच्या फटकेबाजीमुळे 20 षटकात 8 बाद 173 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकात 8 बाद 160 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 174 धावांचे आव्हान असताना डेव्हॉन कॉनव्हेने 56 धावा फटकावल्या. याशिवाय, मोईन अली (34), ऋतुराज गायकवाड (28) यांनी फटकेबाजी केली. मात्र, त्यांचे इतके प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. हर्षलने 35 धावात 3 तर मॅक्सवेलने 22 धावात 2 बळी घेतले.
प्रारंभी, मोईन अली व महिश तिक्षणा यांनी एकत्रित 5 बळी घेतल्यानंतरही आरसीबीने निर्धारित 20 षटकात 8 बाद 173 धावांचा डोंगर रचला. मोईन अलीने 28 धावात 2 तर तिक्षणाने 27 धावात 3 बळी घेतले. मोईन अलीने विराट कोहली (33 चेंडूत 30), फॅफ डय़ू प्लेसिस (22 चेंडूत 38) या आघाडीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला तर तिक्षणाने डावातील 19 व्या षटकात 3 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. डेव्हॉन प्रिटोरियसने 42 धावात 1 बळी घेतला.
आरसीबीतर्फे महिपाल लोमरोरने 27 चेंडूत सर्वाधिक 42 धावा फटकावल्या तर दिनेश कार्तिकने 17 चेंडूत 26 धावांची आतषबाजी केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे आरसीबीला 170 धावांचा टप्पा सर करता आला. कोहली व प्लेसिस यांनी अननुभवी मुकेश चौधरी (0-30) व सिमरजीत सिंग (0-21) यांचा उत्तम समाचार घेतल्यानंतर आरसीबीने पॉवर प्लेच्या 6 षटकात बिनबाद 57 अशी जोरदार सुरुवात केली होती.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी ः 20 षटकात 8 बाद 173 (महिपाल लोमरोर 27 चेंडूत 42, फॅफ डय़ू प्लेसिस 22 चेंडूत 38, विराट कोहली 33 चेंडूत 30, दिनेश कार्तिक 17 चेंडूत नाबाद 26. अवांतर 12. महिश तिक्षणा 3 षटकात 3-27, मोईन अली 2-28, प्रिटोरियस 1-42).
चेन्नई सुपरकिंग्स ः 20 षटकात 8 बाद 160 (डेव्हॉन कॉनव्हे 37 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 56, मोईन अली 27 चेंडूत 34, ऋतुराज गायकवाड 23 चेंडूत 28, डेव्हॉन प्रिटोरियस 8 चेंडूत 13. अवांतर 4. हर्षल पटेल 3-35, ग्लेन मॅक्सवेल 2-22, हसरंगा, हॅझलवूड, शाहबाज प्रत्येकी 1 बळी).
बॉक्स
धोनीसाठी चेन्नई सुपरकिंग्सतर्फे 200 वा सामना
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी चेन्नईकरिता खेळाडू या नात्याने 200 वा सामना ठरला. आरसीबीविरुद्ध साखळी सामन्यात त्याने हा 200 सामन्यांचा माईलस्टोन सर केला. कर्णधार या नात्याने धोनीने चेन्नईला चार वेळा (2010, 2011, 2018, 2021) आयपीएल जेतेपदे मिळवून दिली असून सध्या बंद केल्या गेलेल्या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेतही दोन वेळा (2010 व 2014) विजय मिळवले आहेत.
धोनीने चेन्नईशिवाय सध्या बरखास्त रायजिंग पुणे सुपरजायंट संघाचेही 2016 व 2017 मध्ये प्रतिनिधीत्व केले. यापैकी 2017 मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पण, त्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आयपीएल कारकिर्दीत धोनीने 229 सामन्यात 39.40 च्या सरासरीने 4886 धावा जमवल्या. त्याने 24 अर्धशतके झळकावली असून नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यंदा त्याने गुरुवारच्या लढतीपूर्वी 9 सामन्यात 35.00 च्या सरासरीने 140 धावांचे योगदान दिले.