सामनावीर हसरंगाचे 5 बळी, डय़ू प्लेसिसचे नाबाद अर्धशतक, दिनेशची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ मुंबई
कर्णधार डय़ू प्लेसिसचे नाबाद अर्धशतक, दिनेश कार्तिकची तुफानी फटकेबाजी आणि सामनावीर फिरकीचा जादुगार वणिंदू हसरंगाचा भेदक मारा यांच्या बळावर आरसीबीने आयपीएलच्या या मोसमातील सातवा विजय नोंदवताना सनरायजर्स हैदराबादवर 67 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयानंतर त्यांचे चौथे स्थान कायम राहिले असून प्लेऑफच्या आशाही बळावल्या आहेत.
प्रथम फलंदाजी निवडल्यावर डय़ू प्लेसिसने आघाडीवर राहत 50 चेंडूत नाबाद 73 धावांची शानदार खेळी केली तर दिनेश कार्तिकने अखेरच्या टप्प्यात तुफानी फटकेबाजी करीत केवळ 8 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी केल्याने अडखळत सुरुवात झाल्यानंतरही आरसीबीने 20 षटकांत 3 बाद 192 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर त्यांनी या कठीण आव्हानाचा पाठलाग करणाऱया सनरायजर्स हैदराबादचा डाव 19.2 षटकांत 125 धावांत गुंडाळून शानदार विजय साकार केला. फक्त राहुल त्रिपाठीने एकाकी लढत देताना 37 चेंडूत 58 धावा फटकावल्या. याशिवाय मॅरक्रम (21) व पूरन (19) या अन्य दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
हैदराबादचा हा सलग चौथा पराभव असून हसरंगाच्या फिरकीसमोर त्यांचा डाव ढेपाळला. त्याने 18 धावांत 5 बळी टिपले. यापूर्वी पहिल्या टप्प्यात हैदराबादने आरसीबीला 9 गडय़ांनी हरविले होते. त्याची परतफेडही आरसीबीने या सामन्यात केली. ब्रेबॉर्नवर झालेल्या त्या सामन्यात आरसीबीचा फक्त 68 धावांत धुव्वा उडाला होता.
हसरंगाकडून काही वेळा गचाळ क्षेत्ररक्षण झाले होते, पण त्याने त्याची भरपाई गोलंदाजीत करताना राँगवनचा हुशारीने वापर करत मधल्या षटकांत हैदराबादच्या फलंदाजांना गुंडाळले. त्याने हार्डहिटर निकोलस पूरन व जगदीश सुचित यांना लागोपाठच्या षटकांत बाद केले. आपल्या शेवटच्या षटकात त्याने दोन बळी मिळविताना निर्धाव षटक टाकले. या षटकात त्याने शशांक सिंग व उमरान मलिक यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करीत आरसीबीचा विजयही निश्चित केला.
या आयपीएलमध्ये 20 हून अधिक बळी मिळविणारा हसरंगा हा दुसरा गेलंदाज बनला. यजुवेंद्र चहलने 22 बळी मिळवित पर्पल कॅप स्वतःकडे राखली आहे. हसरंगाचे आता 21 बळी झाले आहेत.
हैदराबादला त्रिपाठीने अर्धशतकी खेळी करीत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. पण हॅझलवूडने त्याला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर कार्तिक त्यागीला बाद केल्यावर हैदराबाद बॅकफूटवर गेले ते अखेरपर्यंत त्यातून सावरू शकले नाहीत. या सामन्यात आरसीबी व हैदराबाद या दोन्ही संघांना पहिल्याच चेंडूवर बळी गमवावा लागला. आरसीबीचा कोहली या मोसमात तिसऱयांदा व एकंदर सहाव्यांदा गोल्डन डकवर बाद झाला तर हैदराबादचा विल्यम्सन शून्यावर धावचीत झाला. कोहलीच्या या मोसमात 12 डावात 216 धावा झाल्या आहेत.
डय़ू प्लेसिसचे अर्धशतक
तत्पूर्वी, डय़ू प्लेसिसने आपल्या 50 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार व 2 षटकार मारले. या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे. कोहली लवकर बाद झाला असला तरी त्याने रजत पाटीदारसमवेत दुसऱया गडय़ासाठी 73 चेंडूत 105 धावांची भागीदारी करीत भक्कम पायाभरणी केली. पाटीदारने 38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 48 धावा काढल्या. मात्र नंतर हैदराबादचा स्पिनर जगदीश सुचित व भुवनेश्वर कुमार यांनी अचूक मारा करीत त्यांच्या धावांना ब्रेक लावला. मॅक्सवेलने थोडीफार फटकेबाजी करीत 24 चेंडूत 33 धावा काढताना 4 चौकार, 2 षटकार मारले. अखेरच्या टप्प्यात दिनेश कार्तिकने धुवाधार फटकेबाजी केली. त्याने शेवटच्या षटकात 25 धावा झोडपत संघाला दोनशेच्या जवळपास मजल मारून दिली. त्याला तिसऱया चेंडूवर राहुल त्रिपाठीकडून जीवदान मिळाले होते. त्याने 8 चेंडूंच्या खेळीत 4 षटकार व एक चौकार मारला.
संक्षिप्त धावफलक ः आरसीबी 20 षटकांत 3 बाद 192 ः डय़ू प्लेसिस नाबाद 73 (50 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), कोहली 0, पाटीदार 48 (38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मॅक्सवेल 33 (24 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), दिनेश कार्तिक नाबाद 30 (8 चेंडूत 1 चौकार, 4 षटकार), अवांतर 8. गोलंदाजी ः सुचित 2-30, कार्तिक त्यागी 1-42.
सनरायजर्स हैदराबाद 19.2 षटकांत सर्व बाद 125 ः राहुल त्रिपाठी 58 (37 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), मॅरक्रम 21 (27 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), पूरन 19 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शशांक सिंग, भुवनेश्वर प्रत्येकी 8, अवांतर 7. गोलंदाजी ः हसरंगा 5-18, हॅझलवूड 2-17, हर्षल पटेल 1-20, मॅक्सवेल 1-13.