आयपीएल साखळी फेरीत पराभवाची मालिका खंडित करण्याचे सीएसकेचे लक्ष्य
नवी मुंबई / वृत्तसंस्था
यंदा अतिशय खराब सुरुवात करणाऱया विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्ससमोर आज (मंगळवार दि. 12) ‘हाय-फ्लाईंग’ आरसीबीचे आव्हान असणार आहे. सलग चार पराभवांमुळे चेन्नईच्या खेळाडूंचे मनोधैर्य खचले असल्याची कबुली या संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीच दिली असून आजच्या लढतीत तरी चेन्नई बाजी पलटवणार का, याची उत्सुकता असेल. या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
आतापर्यंत 4 वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नईला यंदा सलग चार पराभव पचवावे लागले आहेत. रविंद्र जडेजाला पुढाकाराने नेतृत्व हाताळता आलेले नाही, याची यादरम्यान अनेकदा प्रचिती आली आणि या बिकट स्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्वप्रथम ‘थाला’ धोनी, रॉबिन उत्थप्पा, अम्बाती रायुडू व डेव्हॉन ब्रेव्हो यांना आपला सर्वोत्तम खेळ साकारावा लागेल.
चेन्नईने यादरम्यान केवळ एकदाच 200 पेक्षा अधिक धावा जमवल्या असून उर्वरित 3 लढतीत त्यांची कामगिरी सुमार दर्जाची राहिली आहे. आरसीबीच्या गोलंदाजी ताफ्यात हसरंगा, डेव्हिड विली व मोहम्मद सिराजसारखे अव्वल दर्जाचे स्टार असून त्यांना सामोरे जाण्याचे आव्हान चेन्नईसमोर असेल. युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला या हंगामात अद्याप सूर सापडला नसल्याने ही देखील चेन्नईची आणखी एक चिंतेची बाब आहे. अष्टपैलू मोईन अली व शिवम दुबे यांनाही अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल, हे स्पष्ट आहे.
दीपक चहरची गैरहजेरी व सर्व आघाडय़ांवरील सुमार दर्जाचा खेळ, असे चेन्नईच्या अपयशाचे दुहेरी कारण असल्याचे मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी विशद केले असून फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडय़ांवर सरस खेळ साकारण्याची अपेक्षा त्यांनी नोंदवली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपरकिंग्स ः रविंद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, दीपक चहर, अम्बाती रायुडू, रॉबिन उत्थप्पा, मिशेल सॅन्टनर, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, डेव्हॉन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम असिफ, सी. हरी निशांत, एन. जगदीशन, सुब्रांशू सेनापती, के. भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरनजीत सिंग, मुकेश चौधरी.
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनूज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
आरसीबीचा संघ सर्व आघाडय़ांवर सरस
फॅफ डय़ू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ यंदा सर्व आघाडय़ांवर सरस ठरत आला असून हीच मालिका आज चेन्नईविरुद्धही कायम राखली तर वर्चस्व गाजवणे त्यांच्यासाठी फारसे आव्हानात्मक नसेल. सलामीवीर अनूज रावतने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमधील पहिलेवहिले अर्धशतक नोंदवले तर विराट कोहलीची बॅटही तळपली. कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस जागतिक स्तरावरील कोणत्याही गोलंदाजाची चिरफाड करण्याची क्षमता राखून असून यामुळे आरसीबीला पहिल्या तीन क्रमांकावर कोणतीही चिंता नाही.
दिनेश कार्तिक फायरिंग फिनिशर म्हणून नावारुपास आला असून इंजिनियरिंगकडून क्रिकेटकडे वळलेल्या शाहबाज अहमदने देखील फलंदाजीत उत्तम चुणूक दाखवली आहे. अनुभवी डेव्हॉन ब्रेव्होचा अपवाद वगळता चेन्नईचे गोलंदाज उत्तम मारा करत आले आहेत. नवोदित मुकेश चौधरी मात्र महागडा ठरत आला आहे. सीएसकेला ‘राईट कॉम्बिनेशन’ची जोड देता आली नाही तर ही बाबही आरसीबीच्या पथ्यावर पडू शकते.