कोरगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रमात वाण स्वरुपात ‘साऊ’ पुस्तकाचे वाटप : माधवी गवंडी यांची संकल्पनेतून
प्रतिनिधी /पेडणे
मकर संक्रांती म्हटल्यानंतर महिलांमध्ये एक उत्साह असतो. यानिमित्त सुवासिनींना सन्मानाने घरीबोलावून विविध प्रकारच्या वस्तू भेट स्वरुपात वाण एकमेकीना देतात. परंतु. यंदा देवसू कोरगाव येथील शिक्षिका माधवी महादेव गवंडी यांनी प्रथमच मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनींना हळदीकुंकूसह ज्ञानज्योती क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘साऊ’ हे पुस्तकाच्या प्रती वितरण करून ‘सावित्रीबाई फुले वाचा’ असा आगळावेगळा संदेश दिला.
महिलांना शिक्षण मिळून ज्ञान प्राप्त व्हावे. समाजातील वाईट रुढी, प्रथा अंधश्र्रद्धा या गोष्टीवर मात करावी. याद्वारे महिलांनीही शिक्षणातून आपली ज्ञानाची ज्योत कुटुंबात पेटवावी. यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठे योगदान दिले. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कायम स्मरण व्हावे यासाठी माधवी गवंडी यांनी रविवारी 14 रोजी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात सुवासिनांना वाण स्वरुपात ‘साऊ’ या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप केले. प्रथम सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि झाडाला पाण्याचे सिंचन केले.
रविवारी 14 रोजी देवसू कोरगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तोरसे जि. पं. सदस्य सीमा खडपे, मानवाधिकार संघटन राज्यप्रमुख सीमा बेहरे, पेडणे नगरसेविका अश्विनी पालयेकर, शिक्षिका शांती किनळेकर, प्रज्ञा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मिनी पी. एस., शिक्षिका राजश्री वेंगुर्लेकर, सुवर्णा गवंडी, कोरगावच्या माजी सरपंच स्वाती गवंडी, नव चेतना युवक संघ पेडणेचे कृष्णा पालयेकर, शाहू आंबेडकर फुले प्रतिष्ठानचे महादेव गवंडी, उमा तळवणेकर, निर्मला बांदेकर आदी उपस्थित होत्या.
सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घ्या !
मकर संक्रातीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम म्हणजे महिलांच्या आनंदाचा आणि दाग दागिने घालून जो मिरवण्याचा सोहळा असे मानले जाते. शिक्षिका माधवी गवंडी यांनी सावित्रीबाई यांची प्रेरणा महिलांना मिळण्यासाठी हळदी कुंकू समारंभात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तक वाटप करून सर्वांनी महिलांनी तिळगुळ घ्या गोड गोड बोला तसेच ‘सावित्रीबाई फुले वाचा’ असा संदेश या दिला आहे, असे प्रतिपादन जि. पं. सदस्य सीमा खडपे यांनी केले.
यांनी आपल्या विचारातून हा समाज हा देश या देशातील प्रत्येक महिलांना घडवले. म्हणून आज आम्ही ताट मानेने महिला सर्वत्र कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो, असे मानव अधिकार राज्यप्रमुख सीमा सुरज बेहरे म्हणाल्या.
सर्व महिलांनी क्रांतिवीर ज्योती सावित्रीबाई फुले हिला वाचावे. हा संदेश देतानाच मकर संक्रांतीच्या सणाच्या माध्यमातून महिलांनी चांगल्या कर्तुत्वाने आपली प्रगती साधून सर्वांगीण दृष्ट्या सक्षम व्हावे, असे माधवी गवंडी यांनी आवाहन केले. प्रज्ञा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पिरिस, शांती किनळेकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर शिक्षिका माधवी गवंडी यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले.
रिया गवंडी, रिद्धी गवंडी यांनी पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. महादेव गवंडी यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले तर माजी सरपंच स्वाती गवंडी यांन आभार मानले.