बालचमूंना आकर्षण, विविध आकारात उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
थर्टिफस्टच्या पार्श्वभूमीवर शहरात रेडिमेड (तयार) ओल्डमॅन विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे खरेदीकडे तरुणांचा कल वाढला आहे. विविध आकारांमध्ये आणि रंगांमध्ये आकर्षक ओल्डमॅन विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. शनिवारी 31 डिसेंबर असल्याने विक्री वाढेल, अशी आशा विक्रेत्यांना आहे.
कोरोना संकटानंतर यंदा प्रथमच होत असलेल्या निर्बंधमुक्त थर्टिफस्टसाठी तरुणाई सज्ज झाली आहे. शिवाय थर्टिफस्टची तयारीदेखील केली जात आहे. विशेषत: ओल्डमॅनचे दहन करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. त्यामुळे तयार ओल्डमॅनला मागणी वाढू लागली आहे. त्याबरोबर काही ठिकाणी तरुण आणि बालचमू एकत्रित येत स्वत:च्या कल्पनेतून ओल्डमॅन तयार करताना दिसत आहेत.
5 ते 15 फुटापर्यंत ओल्डमॅन दाखल
शहरातील काँग्रेस रोड आणि इतर ठिकाणी रेडिमेड ओल्डमॅन विक्रीसाठी ठेवले आहेत. अलीकडे वेगवेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. मोटू पतलू, व्हेंपायर, स्टीकर ब्लेंडर आदी ओल्डमॅन तयार करण्यात आले आहेत. साधारण 900 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत ओल्डमॅन उपलब्ध झाले आहेत. विविध रंगांचे प्लास्टिक वापरून तयार करण्यात आलेले ओल्डमॅन आकर्षण ठरत आहेत. साधारण 5 ते 15 फुटापर्यंत ओल्डमॅन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे युवकांचे आणि बालचमूंचे आकर्षण वाढले आहे.