बाधकाममंत्री निलेश काब्राल यांची जाहीर नाराजी
प्रतिनिधी /धारबांदोडा
सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जनतेची कामे जलदगतीने झाली पाहिजेत. या खात्यात आपल्याला हवे त्याप्रमाणे काम करण्याचे स्वतंत्र नसल्यास आपण बांधकाम खात्याचा राजीनामा द्यायला तयार आहे. तसे मुख्यमंत्र्यांनाही आपण कळविले आहे, असे सांगत खात्यातील प्रशासकीय कार्य पद्धतीबद्दल बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
साकोर्डा येथील स्मशानभूमिच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी त्यांनी प्रसार म्घध्यमांसमोर हे थेट विधान केले. बांधकाम खात्यातर्फे अंदाजे रु. 57 लाख खर्चुन बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा या स्मशानभूमीचे उद्घाटन मंत्री काब्राल यांच्याहस्ते करण्यात आले. बांधकाम खात्याला निधी उपलब्ध करून देताना खात्याचे लेखपाल उपस्थित असतात. एखाद्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर संबंधीत फाईल खर्चाची मान्यता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाते. ती मंजूर होऊन येईपर्यंत कामाला विलंब होतो. या किचकट प्रक्रियेमुळे अभियंत्यांनी कितीही वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी ते वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी जनतेच्या दोषारोपांना खात्याला सामोरे जावे लागते. या किचकट प्रक्रियेत बदल झाला पाहिजे, असे मंत्री काब्राल म्हणाले. साकोर्डा येथील ही स्मशानभूमी खांडेपारकर या कंत्राटदाराने उत्तम पद्धतीने बांधलेली आहे. प्रत्यक्ष काम पाहताच निधीचा योग्यप्रकारे उपयोग झाल्याचे त्यातून दिसून येते. अशा प्रकारचे कंत्राटदार मिळाल्यास अनेक सार्वजनिक कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करता येतील, असेही मंत्री काब्राल यांनी नमूद केले.
यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, स्थानिक आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गांवकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, साकोर्डाच्या सरपंच उज्ज्वला गावकर, उपसरपंच नेहा कालेकर, पंचसदस्य शिरीष देसाई, गौतम सावंत, विंदा सावंत, बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते सुधीर परब, मोले पंचायतीच्या सरपंच तन्वी केरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्मशानभूमीचे बांधकाम चांगल्या पद्धतीने करण्यात आले असून त्यात विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, असे सांगून पंचायतीने स्मशानभूमीची योग्यप्रकारे देखरेख करण्याची सूचना आमदार गणेश गांवकर यांनी केली. सावर्डे मतदारसंघाला यापूर्वी बांधकाम खात्याचे मंत्री लाभूनही गेल्या वर्षी आलेल्या पुरात खचलेल्या भरीपवाडा व मेटवाडा कुळे येथील पुलाच्या पायथ्याचे दुरुस्तीकाम होऊ शकले नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आमदार गणेश गांवकर म्हणाले.
विनय तेंडुलकर म्हणाले, यापूर्वी गणेश गांवकर आमदार असताना साकोर्डा स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार होऊन त्याला मान्यताही मिळाली होती. गेली काही वर्षे हा प्रकल्प रेंगाळत पडला व आता तो पूर्ण झालेला आहे. पंचायत निवडणुकीत चांगली कामे करणारे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक पंचसदस्य शिरीष देसाई यांनी स्मशानभूमीच्या कामात कशा प्रकारे अडचणी आल्या व त्यावर आपण सरपंच असताना कशी मात केली याचा आढावा घेतला. या प्रकल्पाबद्दल उपस्थितांनी शिरीष देसाई यांच्या कामाचा गौरव केला. उज्ज्वला गांवकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक जोशी यांनी तर गौतम सावंत यांनी आभार मानले.