बनावट तिकीटांमुळे अभूतपूर्व गोंधळ, सामन्याला 37 मिनिटे उशिराने प्रारंभ,
पॅरिस / वृत्तसंस्था
रियल माद्रिदने शनिवारी विक्रमी 14 व्या वेळा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. स्टेडियमबाहेर बनावट तिकीटांमुळे गोंधळ निर्माण झाल्यानंतर तब्बल 37 मिनिटे उशिराने सुरु झालेल्या या लढतीत त्यांनी लिव्हरपूलला 1-0 अशा फरकाने नमवले. ब्राझील विंगर व्हिनिसियस ज्युनियरने 59 व्या मिनिटाला फेडेरिकोच्या पासवर केलेला गोल निर्णायक ठरला. याशिवाय, गोलरक्षक कोर्टोईसने सॅडिओ माने व मोहम्मद सलाहचे वेगवान फटके थोपवत या विजयात मोलाचा वाटा उचलला.
माद्रिदच्या कार्लो ऍन्सेलोट्टी यांच्यासाठी हे चौथे युरोपियन कप जेतेपद ठरले. या स्पर्धेच्या इतिहासात मॅनेजर या नात्याने त्यांचा विक्रम ठरला. आम्हीच सर्वोत्तम आहोत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे माद्रिदचा स्ट्रायकर करीम बेन्झेमा याप्रसंगी म्हणाला.
लिव्हरपूलचा संघ यंदा चौरंगी जेतेपदासाठी प्रयत्नशील होता. पण, मागील आठवडय़ात त्यांना प्रीमियर लीग टायटलच्या शर्यतीत केवळ एका गुणाने मागे रहावे लागले आणि त्यानंतर आता चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये एका गोलने पराभव पत्करावा लागला.
हंगामातील 64 वा सामना खेळणाऱया लिव्हरपूलकडे वर्ल्ड सॉकरमधील सर्वात आक्रमक फॉरवर्ड लाईनअप आहे. मात्र, तीन कप फायनल्समध्ये ते एकही गोल करु शकले नसल्याचे या निकालावरुन अधोरेखित झाले. रेड्स या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱया लिव्हरपूलने एफए कप व लीग कप पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकले असले तरी त्यापूर्वी अवांतर वेळेपर्यंत रंगलेल्या फायनल्समध्ये 0-0 बरोबरीची कोंडी कायम होती.
स्टेडियम परिसरात चाहत्यांचा गोंधळ
प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विशेषतः लिव्हरपूलच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्यासाठी झटापटीला सामोरे जावे लागले. चाहत्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याने पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. बनावट तिकिटांमुळे हा गोंधळ उडाला.
चाहत्यांनी खरेदी केलेली हजारो तिकिटे बनावट निघाली आणि टर्नस्टाईल्समध्ये ही तिकिटे रिजेक्ट होत राहिल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. सरळ मार्गाने प्रवेश मिळत नसल्याचे पाहत काही चाहत्यांनी फेन्स ओलांडून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा मार्ग पत्करला आणि त्यानंतर पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्ग अवलंबणे भाग होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, रात्री 9 वाजता ही लढत सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, 15 मिनिटांचा कालावधी बाकी असताना सामना उशिराने सुरु होणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आणि यानंतर स्टेडियमच्या आतील प्रेक्षकांनी गोंधळ सुरु केला होता.
लिजेंड मार्सेलोची माद्रिदमधून ‘एक्झिट’ची घोषणा
लिजेंड फुटबॉलपटू मार्सेलोने आपण स्पॅनिश क्लब रियल माद्रिदमधून एक्झिट घेत असल्याची घोषणा सामन्यानंतर केली. मी यावेळी आनंदी आहे आणि भावूक देखील, असे त्याने माद्रिदच्या 14 व्या युरोपियन जेतेपदानंतर जाहीर केले. रियल माद्रिदतर्फे हा माझा शेवटचा सामना होता, असे तो म्हणाला. ब्राझिलियन मार्सेलोसाठी ही 25 वी ट्रॉफी असून यात 5 चॅम्पियन्स लीग, 4 क्लब वर्ल्डकप, 3 युरोपियन सुपर कप, 6 ला लिगा, 2 कोपा डेल रे व 5 स्पॅनिश सुपर कप जेतेपदांचा समावेश आहे.