विद्यार्थी संसद स्पर्धेत साळगावकर कायदा महाविद्यालय प्रथम
पणजी : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनातच विधानसभेचे कामकाज व बारकावे शिकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे सक्षम नागरिक आहेत. सर्व विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळणार नसली तरी प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रात राहूनही लोकप्रतिनिधीचे काम करू शकतो. त्यासाठी विधानसभेचे चालणारे कामकाज व हिवाळी, उन्हाळी व पावसाळी अधिवेशनातील मुद्दे टिपल्यास त्यांना भावी जीवनात त्याचा उपयोग होईल. केवळ सरकारी नोकरी किंवा सरकार आपल्याला नोकरी देईल, या आशेवर न राहता नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक व व्यावसायिक बनून प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदारी ओळखून आदर्श व्यक्ती बनावी, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले. गोवा विधीकार मंचतर्फे आज (सोमवारी) घेण्यात आलेल्या ‘विद्यार्थी संसद’ स्पर्धेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी उपसभापती ज्योशुआ डिसोझा, विधानसभा सचिव नम्रता उलमन, माजी आमदार व्हीक्टर गोन्सालवीस, मोहन आमशेकर, सदानंद मळीक, जॉन फर्नांडिस उपस्थित होते.
उपसभापती डिसोझा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी हा राज्याचा, देशाचा पाया आहे. हा पाया मजबूत व्हायचा असेल तर त्यांनी कठोर परीश्रम घेणे गरजेचे आहे. गोवा विधीकार मंचतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश हा तुम्ही राज्याचे जबाबदार नागरिक बनणे हा आहे. त्यामुळे या स्पर्धेत जरी इतर महाविद्यालय किंवा विद्यार्थ्यांना यश मिळाले नसलेतरी त्यांनी खचून न जाता ध्येयप्राप्तीची तयारी करावी. ‘विद्यार्थी संसद’ स्पर्धेत मिरामार-पणजी येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाने बाजी मारत चषक पटकावला. आसगाव बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाचे महाविद्यालय अॅण्ड संशोधन केंद्र यांना द्वितीय तर म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाने चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ‘विद्यार्थी संसद’ स्पर्धेच्या कार्यक्रमात राज्यातील बहुतांश महाविद्यालयांनी भाग घेतला होता. यावेळी सहभागी महाविद्यालयांनाही चषक देऊन सन्मानित करण्यात आले. मोहन आमशेकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
‘विद्यार्थी संसद’ स्पर्धेचा निकाल असा :
व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय, मिरामार (प्रथम), ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय अॅण्ड संशोधन केंद्र, आसगाव-बार्देश (द्वितीय), सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा (तृतीय).
वैयक्तिक सहभागी स्पर्धक असे :
उत्कृष्ट मुख्यमंत्री – समृद्धी वायंगणकर (ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय अॅण्ड संशोधन केंद्र, आसगाव-बार्देश), उत्कृष्ट सभापती – शेर्विन कोरिया (व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय, मिरामार), उत्कृष्ट विरोधी पक्षनेता – सिद्धांत शेट्यो (व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय, मिरामार), उत्कृष्ट संसदपटू – सिद्धी महाले (ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय अॅण्ड संशोधन केंद्र, आसगाव-बार्देश), उत्कृष्ट समन्वयक शिक्षक – श्रीपाद एस. मर्चंट व गिरीश अभ्यंकर (ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय अॅण्ड संशोधन केंद्र, आसगाव-बार्देश).