Tarun Bharat

जबाबदारी ओळखा, कामाला लागा!

काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सूचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेतील सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून कामाला लागावे, असे स्पष्ट निर्देश रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षातील नेतेमंडळींना दिले. ज्यांना आपली जबाबदारी पार पाडता येत नाही, त्यांनी नव्या लोकांना संधी द्यावी, असे मतही त्यांनी पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत व्यक्त केले. पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी यांनी पहिल्यांदा स्वतःची जबाबदारी निश्चित करून येत्या 30 ते 90 दिवसात आपला अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

पक्षाप्रती आपल्या जबाबदारीचा सर्वात मोठा भाग म्हणजे संघटनेत वरपासून खालीपर्यंत सर्वांवर निश्चित जबाबदारी असायला हवी. काँग्रेस संघटना मजबूत करताना जबाबदारी निश्चित केल्यास आपण निवडणूक जिंकून देशातील जनतेची सेवा करू शकू, असे खर्गे यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले. सर्वप्रथम आपली स्वतःची आणि संघटनेची जबाबदारी निश्चित व्हायला हवी. सरचिटणीस आणि प्रभारींनी महिन्यातून किमान 10 दिवस आपल्या कार्यक्षेत्रात आढावा बैठका घेतल्या पाहिजेत. प्रत्येक जिल्हा विभागात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घ्यायला हव्यात, असेही खर्गे यांनी सांगितले.

‘सीएससी’ची बैठक रविवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झाली. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर खर्गे यांची ही पहिलीच सुकाणू समितीची बैठक होती. याप्रसंगी खर्गे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीला पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, पी. चिदंबरम आणि पक्षाचे अनेक वरि÷ नेते उपस्थित होते.

फेब्रुवारीत छत्तीसगडमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन

काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन यावेळी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात हे अधिवेशन होणार असले तरी तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी रविवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. फेब्रुवारीच्या दुसऱया पंधरवडय़ात अधिवेशन घेण्याचे ठरवले असून हे अधिवेशन 3 दिवस चालेल असे त्यांनी सांगितले.

26 जानेवारीपासून ‘हाथ से हाथ जोडो’ मोहीम

अधिवेशनाची रुपरेषा निश्चित करण्याबरोबराच ‘भारत जोडो यात्रे’चे यश लक्षात घेऊन आता काँग्रेस ‘हाथ से हाथ जोडो’ ही नवी मोहीम सुरू करणार आहे. भारत जोडो यात्रेच्या भविष्यातील वाटचालीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर 26 जानेवारीपासून ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम साधारणपणे दोन महिने चालणार आहे.

‘एक व्यक्ती-एक पद’ धोरणाला खीळ?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कायम राहणार असल्याचे संकेत रविवारच्या बैठकीदरम्यान मिळाले. संसद अधिवेशनामध्ये मल्लिकार्जुन खर्गे हेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी पक्षांशी चर्चा करतील, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानुसार पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अशी दोन पदे खर्गे यांच्याकडे राहिल्यास ते काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणाच्या विरोधात असेल, अशी चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. पण, 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱया संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खर्गे हेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कायम राहू शकतात. यावषी सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या नामांकनावेळी राहुल गांधी यांनी पक्षात ‘एक व्यक्ती-एक पद’ धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

संसद अधिवेशनाला राहुल गांधींची दांडी

दुसरीकडे, राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या (सीएससी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो’ यात्रेवर आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी कन्याकुमारी येथून या यात्रेला प्रारंभ केला. 3,500 किमीचे अंतर कापून ही पदयात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जात 150 दिवसात पूर्ण होणार आहे. या प्रवासाला 86 दिवस पूर्ण झाले आहेत.

Related Stories

तमिळ राजकारणात ‘सुपरस्टार’चा प्रवेश

Patil_p

भारतातील 20 लाख अकौंट्स व्हॉट्सऍपकडून बंद

Patil_p

चिंता वाढली : दिल्लीत एकाच इमारतीतील 41 जणांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

2047 पर्यंत ‘आत्मनिर्भर’ भारत घडवायचा आहे;राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Archana Banage

पत्नीच्या उपचारासाठी 77 वर्षीय पती सरसावला

Patil_p

चालू वर्षीपासूनच मुलींना ‘एनडीए’मध्ये प्रवेश द्या !

Patil_p