सुती अॅप्रॉन व शेफ कॅप बंधनकारक
प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा मध्यान्ह आहार अधिक सुरक्षित व्हावा, या दृष्टीने कर्नाटक मूल्यमापन प्राधिकरणाने नवीन नियमावलीची शिफारस राज्य सरकारला केली आहे. या शिफारशीनुसार जेवण तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुती अॅप्रॉन व डोक्याला कॅप बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन हे बदल सुचविण्यात आले आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांकडून मध्यान्ह आहार दिला जातो. तर उर्वरित शाळांमध्ये मध्यान्ह आहार तयार केला जातो, यासाठी विद्यार्थी संख्येनुसार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 2006 साली राज्य सरकारने अॅप्रॉन खरेदीसाठी अनुदान मंजूर केले होते. त्यानंतर अद्याप अॅप्रॉन खरेदीसाठी अनुदान देण्यात आलेले नाही.
मध्यंतरीच्या काळात मध्यान्ह आहारामध्ये केस व इतर कचरा सापडला होता. त्यामुळे जेवण तयार करणाऱ्या महिलांसाठी सुती अॅप्रॉन व डोक्याला कॅप बंधनकारक करावी, अशी सूचना मूल्यमापन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे केली आहे. जेणेकरून आहारावाटे कोणतीही वस्तू विद्यार्थ्यांच्या शरीरात जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
मध्यान्ह आहार मिळणार 2 टप्प्यात
मध्यान्ह आहार वितरणावेळी मोठ्या शाळांमध्ये गर्दी होते. यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा आहार मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढील काळात दोन टप्प्यांमध्ये मध्यान्ह आहाराचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते पाचवीसाठी दुपारी 1 ते 1.45 तर सहावी ते दहावीसाठी 2 ते 2.40 या वेळेत आहार वितरण केले जाणार आहे.
बेळगाव जिल्हा दृष्टिक्षेपात
• सरकारी शाळांची संख्या – 1506
• अनुदानीत शाळा – 259
• मध्यान्ह आहार तयार करणाऱ्या सेविका – 4008