बसव जयंती, रमजान-ईद साजरी : कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांचा पुढाकार
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी बसव जयंती व रमजान-ईदनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या पुढाकारातून सलोख्याचे दर्शन घडविण्यात आले. ‘सलोख्यासाठी भारत आणि विविधतेत एकात्मता’ हे घोषवाक्मय कारागृहात झळकत होते.
सुरुवातीला महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कारागृहातील अधिकारी वाय. एस. नायक, अभिषेक, राजेश, बसवराज, शिक्षक शशिकांत यादगुडे आदी उपस्थित होते. कैद्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी केलेल्या सामाजिक क्रांतीची माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना कृष्णकुमार म्हणाले, बसवेश्वरांनी जातीभेद, लिंगभेद आणि अंधश्रद्धा दूर करून समाजाला नवी दिशा दाखविली. वर्षानुवर्षे दबलेल्या माणसांना खऱया अर्थाने माणूस बनविण्यासाठी त्यांनी क्रांती केली. त्यांची वचने प्रत्येकांना दिशा दाखविणारी आहेत. बसवेश्वरांच्या वचन साहित्यात सामाजिक समानतेचा संदेश आहे.
त्यानंतर रमजान-ईदनिमित्त कार्यक्रम झाला. कृष्णकुमार यांनी गेला महिनाभर रमजान-ईदनिमित्त उपवास करणाऱया कैद्यांसमवेत ईद साजरी केली. कोणताही धर्म वाईटाचे समर्थन करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने याची जाणिव ठेवावी. कारागृहात प्रत्येक जाती-धर्माचे कैदी येतात. यात मनुष्य धर्म खरा आहे. माणुसकी जपणे, एकमेकांवर प्रेम करणे, एकमेकांना साहाय्य करणे हे प्रत्येक धर्माने शिकविले आहे, असे सांगत त्यांनी कैद्यांना रमजान-ईदच्याही शुभेच्छा दिल्या. रमजान-ईदनिमित्त कारागृहात नमाज पठणही झाले.