एक मिनिटात 68 बेसबॉल बॅट तोडण्याची कामगिरी
जगात एकाहून एक सरस असणाऱया प्रतिभेची कमी नाही. अशाच प्रकारच्या प्रतिभा असणारे अनोखे लोकच विश्वविक्रम करत असतात. जर्मनीतील मोहम्मद कहरीमॅनोविकने 1 मिनिटात सर्वाधिक बेसबॉल बॅट तोडून विक्रम केला आहे. त्याचे नाव पुन्हा एकदा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाले आहे. कहरीमॅनोविकने एक मिनिटात सर्वाधिक 68 बेसबॉल बॅट तोडण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. स्वतःच्या हातांच्या या कमालमुळे त्याला ‘हॅमर हँड्स’ या नावाने देखील ओळखले जाते.
मोहम्मद कहरीमॅनोविकने इटलीत एका शोच्या सेटवर स्वतःचा नवा विक्रम नोंदविला आहे. त्याने मिनिटात स्वतःच्या हातांनी 68 बेसबॉल बॅट तोडल्या आहेत. यासंबंधीचा व्हिडिओ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने प्रसारित केला आहे.
कहरीमॅनोविक स्वतःच्या बळकट हातांनी एकाहून एक मजबूत गोष्टी खेळण्यांप्रमाणे तोडण्यासाठी ओळखला जातो. याचमुळे त्याला ‘हॅमर हँड’ देखील म्हटले जाते. यापूर्वी कहरीमॅनोविकने नारळ तोडण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला होता. त्यादरम्यान तो नारळ पटापट फोडत चालला होता.