जगभरात नाव कमाविणे सोपे नसते. अचाट कामगिरी करून विश्वविक्रम स्वतःच्या नावावर नोंदविणे तर अधिकच अवघड असते. काही वेगळे, अनोखे, कधी कधी काही अतरंगी कृत्य देखील मोठे फायद्याचे ठरते. अशाप्रकारचे कृत्य वेगळी ओळख मिळवून द्यायला आणि लोकांच्या नजरेत वेगळा ठरविण्यास उपयुक्त असते. अशाच एका व्यक्तीने स्वतःच्या डोळय़ांद्वारे गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नेंदविले आहे.
या व्यक्तीने डोळय़ांचा वापर करत विश्वविक्रम केला आहे. सिडनी डे कार्वाल्हो हे स्वतःच्या डोळय़ांच्या बुब्बुळांना पूर्णपणे बाहेर काढू शकतात, हा प्रकार पाहून कुणीही घाबरून जातो. परंतु त्यांना हे कौशल्य निसर्गानेच दिले आहे. या कौशल्याच्या बळावर ते जगभरात नाव कमावत आहेत.
डोळय़ांमधील बुब्बुळांद्वारे ते लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि या अनोख्या प्रतिभेद्वारे त्यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविण्यास यश मिळविले आहे. सिडनी स्वतःच्या डोळय़ांना अत्यंत अधिक प्रमाणात फैलावू शकतात, हा प्रकार सर्वसामान्य माणसांना शक्य नसतो. निसर्गानेच त्यांना या दुर्लभ स्थितीने गौरविले आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने स्वतःच्या 2023 च्या आवृत्तीत सिडनी यांना स्थान दिले आहे. मागील वर्षी 10 जानेवारी रोजी ब्राझीलच्या साउथ पालोमध्ये सिडनी यांनी डोळय़ांना बाहेर काढण्याची कामगिरी करून दाखविली होती. त्यानंतर एका ऑप्टोमेट्रिस्टने प्रोप्टोमीटर नावाच्या यंत्राद्वारे सिडनी कार्वाल्हो यांच्या डोळय़ांचा फैलाव मोजला होता.
सिडनी यांच्यानुसार त्यांचे हे कौशल्य म्हणजे दैवाने दिलेली भेट आहे. सिडनी हे स्वतःच्या चेहऱयावरील स्नायूंचा वापर करत डोळय़ांच्या बुब्बुळांना बाहेर काढण्याची अनोखी कामगिरी करू शकतात. सिडनी यांचे डोळे 1.8 सेंटीमीटरपर्यंत बाहेर येण्यास सक्षम आहेत.