गोवा फॉरवर्ड पक्षाची मागणी
प्रतिनिधी /पणजी
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी करण्यात आलेली नोकरभरती रद्द करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. या नोकर भरतीतही गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून खात्यांतर्गत चौकशी चालू आहे. या प्रकरणी कोणीतरी न्यायालयात जाण्यापूर्वी आणि ती भरती रद्द करण्याची नामुष्की येण्यापूर्वी ती रद्द करावी, असे गोवा फॉरवर्डने सुचविले आहे.
पक्षाचे निमंत्रक विकास भगत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला. त्यातही घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून तो विषय न्यायालयात केव्हाही पोहोचू शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्यातील ज्युनियर इंजिनियर्सची भरती सरकारने रद्द केली आहे, तशीच पोलीस उपनिरीक्षक भरती रद्द ठरवावी, अशी मागणी भगत यांनी केली आहे.
एका बाजूने डिजीपी चौकशीचे आदेश देतात आणि दुसऱया बाजूने भरती प्रक्रिया पुढे नेली जाते हा प्रकारच गेंधळात टाकणारा आहे. न्यायालयात हा विषय गेल्यास राज्य सरकारची नाचक्की होऊ शकते, ती टाळण्यासाठी सरकारने पीएसआय भरतीच रद्द केलेली बरी, असे निवेदन भगत यांनी केले आहे.