सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता : अत्यावश्यक यंत्रणेला सज्जेचा आदेश
प्रतिनिधी / पणजी
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. आज 11 से.मी.पर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी पावसाचा जोर वाढलेला असून आज दिवसभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गोवा सरकारने प्राथमिक व माध्यमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला विशेषतः अत्यावश्यक यंत्रणेला सज्ज राहाण्याचा आदेश दिला आहे. दक्षता विभाग अतिसक्रिय केलेला आहे.
गोव्यात आज मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने व्यक्त केले आहे. कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम म्हणून कोकण व गोव्यात जोरदार पाऊस पडणार आहे. पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सारी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्य़मंत्र्यांनी दोन्ही जिल्हा प्रशासनाला अत्यावश्यक सेवा सक्रिय ठेवा व संभाव्य पूर येण्याच्या जागी सुरक्षाकर्मी तैनात ठेवण्यास सांगितले आहे. अग्निशामक दलाने देखील कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
राज्यभरात सर्वत्र मुसळधार
गेल्या 24 तासांत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. म्हापसा येथे 1 इंच, पेडणे 1.75 इंच, फोंडा 2 इंच, पणजी पाउण इंच, जुने गोवे 1 इंच, सांखळी 2.5 इंच, वाळपई 3.5 इंच, काणकोण 2.5 इंच, दाबोळी 1 से.मी., मडगाव 1 इंच, मुरगाव अर्धा इंच, केपे 1.75 इंच व सांगे 2.5 इंच एवढा जोरदार पाऊस पडला.
आतापर्यंत पेडणेत सर्वाधिक नोंद
यंदाच्या विक्रमी पावसाने यापूर्वीच अर्धशतक ओलांडलेले आहे. पेडणे येथे यंदाच्या मौसमात सर्वाधिक 66.5 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे तर केपे येथे पावसाची वाटचाल शतकाच्या दिशेने जात आहे. यंदाच्या मौसमात केपेमध्ये 75 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे.
हवामान खात्याने आज मुसळधार व उद्यापासून दि. 11 जैलपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला असून येलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान पणजीत 1.5 इंच तर मुरगावात अर्धा इंच पावसाची नोंद झाली. सायंकाळी पावसाला पुन्हा सुरु झाली व रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता.