वृत्तसंस्था/ मोग्योरोड, हंगेरी
रेड बुलचा ड्रायव्हर मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या हंगेरियन ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. तो दहाव्या क्रमांकावर फेकला गेला होता, पण त्यातून सावरत त्याने जेतेपद पटकावण्यापर्यंत मजल मारली. या जेतेपदामुळे व्हर्स्टापेनकडे आता चॅम्पियनशिप रेसमध्ये 80 गुणांची आघाडी मिळविली आहे. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने दुसरे व त्याचाच संघसहकारी जॉर्ज रसेलने तिसरे स्थान मिळविले.
तिन्ही संघांत जोरदार चुरस लागली होती, त्यामुळे यापैकी कोणीही जिंकू शकेल अशी स्थिती होती. फेरारीच्या कार्लोस सेन्झने चौथे, रेड बुलच्या सर्जिओ पेरेझने पाचवे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने सहावे, मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने सातवे, अल्पाईनच्या फर्नांडो अलोन्सोने आठवे, अल्पाईनच्या एस्टेबन ओकॉनने नववे, ऍस्टन मार्टिनच्या सेबॅस्टियन व्हेटेलने दहावे स्थान मिळवले. या मोसमात मर्सिडीजने दुसरे व तिसरे स्थान मिळवित आणखी एकदा पोडियम डबल मिळविले. फेरारीचा लेक्लर्कही शर्यतीत होता. पण फेरारीच्या नीष्प्रभ धोरणामुळे तो सहाव्या स्थानावर फेकला गेला. 31 व्या लॅपवेळी लेक्लर्क आघाडीवर होता, तेव्हा तो जिंकण्याच्या मार्गावर होता. पण पुढील पिटस्टॉपमुळे तो मागे पडला. फेरारीने व्हर्स्टापेनशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण स्टॉप घेणे फेरारीला नुकसान करणारे ठरले. अन्य ड्रायव्हर्सनी याचा लाभ घेत आगेकूच केली