ड्रोन, क्वाडकॉप्टर, पॅराग्लायडर आणि एअर फुगे उडवण्यास बंदी ः सुरक्षा यंत्रणांची संशयितांवर नजर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याभोवतीचा पाच किमीचा परिसर नो-काईट फ्लाईंग झोन म्हणून घोषित केला आहे. काही गुन्हेगार, समाजकंटक अथवा भारतविरोधी घटक यांच्याकडून हल्ला किंवा भारतीय यंत्रणांवर छुपी नजर ठेवल्या जाण्याच्या शक्यतेने पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स यांसारख्या फ्लाईंग प्लॅटफॉर्मद्वारे पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा आदेश 16 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. या काळात ड्रोन, क्वाडकॉप्टर, पॅराग्लायडर आणि एअर फुगे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांना सुरक्षेचा भंग होऊ नये किंवा धोका होऊ नये म्हणून ऐतिहासिक किल्ल्याभोवतीचा पाच किलोमीटरचा परिसर ध्वजारोहण समारंभापर्यंत “नो काईट फ्लाईंग झोन’’ घोषित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने चांदनी चौक, जामा मशीद, दर्यागंज आणि बडा हिंदू राव या परिसरात राहणाऱया लोकांना विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत.
लाल किल्ल्याभोवती पाच किलोमीटरच्या क्षेत्रात उंच इमारतींच्या छतावर सुमारे 350 सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. सदर कर्मचारी दुर्बिणीच्या सहाय्याने हवाई पाहणी करून सर्वसामान्य लोकांसह संशयितांवर नजर ठेवणार आहेत. येत्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने आतापासूनच सोहळय़ाचा जल्लोष सुरू झाला आहे. या जल्लोषातच हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांकडून आखला जाण्याची शक्यता आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच सुरक्षा दलाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
गुप्तचर विभागाकडूनही अलर्ट
गुप्तचर विभागाने (आयबी) स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलिसांना दहा पानी अहवाल सादर करण्यात आला असून, त्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ला होण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने दोन्ही दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना हल्ले करण्याच्या सूचना दिल्याचे या अहवालात म्हटले आहे. 15 ऑगस्टला हल्ला करण्यासाठी दहशतवादी युएव्ही म्हणजेच मानवरहित हवाई वाहने आणि पॅराग्लायडरचा वापर करू शकतात, असेही आयबीचे म्हणणे आहे. या इशाऱयानंतर दिल्लीचे आयुक्त संजय अरोरा यांनी राजधानीतील विविध ठिकाणांचा आढावा घेतला. तसेच लाल किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली.