हजारो रोहिंग्या शरणार्थी बेघर
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात रोहिंग्या शरणार्थींसाठी निर्माण करण्यात आलेल्या शिबिरात आग लागली आहे. या दुर्घटनेत 2 हजारांहून अधिक शेल्टर होम्स नष्ट झाली आहेत. यादरम्यान कुठलीच जीवितहानी झालेली नाही. परंतु अनेक जण या दुर्घटनेनंतर बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. आग लागण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
कुतुपालोंग भागात 5 मार्च रोजी दुपारी 2.45 वाजता आग लागली. येथेच सर्वाधिक संख्येत शरणार्थींचे वास्तव्य आहे. या आगीमुळे 12 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत अशी माहिती बांगलादेशचे शरणार्थी आयुक्त मिजानुर रहमान यांनी दिली आहे. शिबिरात लागलेली आग विझविण्यास साडेतीन तासांचा कालावधी लागल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. हे शरणार्थी शिबिर पर्वतीय क्षेत्रात असल्याने आग वेगाने फैलावली. तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तेथे पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.
म्यानमारमधून पलायन करत 10 लाखाहून अधिक रोहिंग्या मुस्लीम बांगलादेशात शरणार्थी म्हणून जगत आहेत. बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावरील कॉक्सबाजारमध्ये हे शरणार्थी वास्तव्यास आहेत. शरणार्थी शिबिरात आग लागल्याने हे शरणार्थी आता संकटात सापडले आहेत.