प्रतिनिधी/कोल्हापूर
निवडणूक आयोगामार्फत वंचित घटकांसाठी 27 व 28 नोव्हेंबर या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या शिबिरात दिव्यांग बांधवांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेमार्फत करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने आता वर्षातून चारवेळा आगाऊ मतदार नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. ही नावे जानेवारी 2023 च्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. 1 जानेवारी बरोबरच आता 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर यादरम्यानही मतदार नोंदणी करता येणार आहे. दिव्यांग या वंचित घटकांच्या मतदार नोंदणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर येत्या 27 आणि 28 नोव्हेंबर या दिवशी ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक इच्छूक दिव्यांग व्यक्तीने मतदार नोंदणी करावी, तसेच यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन सक्षम संस्थेचे सचिव डॉ. अमोघ भागवत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सक्षमच्या दिव्यांग सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.