वेंगुर्ले (वार्ताहर)-
शासनाने मच्छिमारांसाठी राबविलेली किसान क्रेडिट कार्ड योजना हि मच्छिमारांच्या फायद्याची असून त्या योजनेअंतर्गत मच्छिमारांना विशीष्ट मुदतीसाठी विशीष्ट कर्ज खेळते भांडवल म्हणून 7 टक्के एवढय़ा कमी व्याजदरांत दिले जाते. हे कर्ज जर बँकेने दिलेल्या विशीष्ट मुदतीत फेडले तर 3 टक्के सबसिडीचा लाभ लाभार्थींना मिळतो. तसेच पुढच्यावेळीहि विहित वेळेपूर्वी कर्ज फेडणाऱ्या लाभार्थींना नवीन खेळते भांडवल त्याच बँकेकेडून मिळू शकते. शासनाने मत्स्यव्यवसाय विकास अंतर्गत राबविलेल्या किसान क्रेडीटकार्ड या योजनेचा लाभ घेऊन मच्छिमारांनी आपला विकास साधावा. असे मार्गदर्शन मालवणच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अश्लेषा गोळवणकर यांनी निवती येथे आयोजन मार्गदर्शन कार्यक्रमांत केले.निवती येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात मत्स्यखात्यातर्फे शासनाच्या मच्छिमारांसाठी राबविण्यांत आलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती देण्याचा कार्यक्रम प्रमुख मार्गदर्शक मालवणच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अश्लेषा गोळवणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरात श्रीराम मच्छिमार सहकारी संस्था कोचराचे चेअरमन सुधीर मेतर, गणेश मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन कमलाकर मेतर, बँकांचे अधिकारी यांचा समावेश होता.या कार्यक्रमांअंती निवती येथील 16 मच्छिमारांची किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत एक ते दिड लाख रूपयांची खेळते भांडवल मिळण्यासाठी मागणी करणारे फॉर्म यावेळी भरून घेण्यात आले असून बँकांचे अधिकारी या योजनेच्या लाभासाठी असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर लाभार्थीना या योजनेचा लाभ मिळणार आहे.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी चिन्मय जोशी व सागरी सुरक्षा रक्षक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमांत दोन्ही सहकारी संस्थांचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.