जपानमधील प्रकार : सरकारची कोंडी वाढली
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमधील सत्तारुढ पक्षाच्या अनेक खासदारांचे ‘युनिफिकेशन चर्च’शी असलेल्या संबंधांवरून वाढत्या वादादरम्यान टीकेचे धनी ठरलेल्या अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. दाइशिरो यामागीवा यांचा राजीनामा पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी आणखी एक झटका आहे. जुलै महिन्यात माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर दक्षिण कोरिया स्थित वादग्रसत चर्चशी पक्षाच्या अनेक नेत्यांचे संबंध असल्याने सरकारची कोंडी झाली आहे.
यामागीवा यांच्या जागी माजी आरोग्यमंत्री शिगेयुकी गोटो यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोटो एक अनुभवी नेते असून ते अत्यंत सक्षम आहेत तसेच आर्थिक आणि सामाजिक सुधारणांबद्दल अत्यंत सजग असल्याचे उद्गार पंतप्रधान किशिदा यांनी मंगळवारी काढले आहेत.
प्रमुख आर्थिक पॅकेजसह प्रमुख धोरणात्मक लक्ष्यांची प्राप्ती करण्यास गोटो हे मध्यवर्ती भूमिका बजावतील अशी अपेक्षा असल्याचे किशिदा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान हे चालू आठवडय़ाच्या अखेरीस या आर्थिक पॅकेजची घोषणा करणार असल्याचे समजते.
1980 च्या दशकानंतर युनिफिकेशन चर्च कामकाजाच्या वादग्रस्त पद्धतीवरून आरोपांना तोंड देत आहे. युनिफिकेशन चर्चकडून वेतनाचा मोठा हिस्सा दान करण्यासाठी सदस्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आहे.
ऑगस्ट महिन्यात 7 मंत्र्यांनी चर्चशी संबंध असल्याचे मान्य केल्यावर पंतप्रधान किशिदा यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केला होता. यामागीवा हे अर्थमंत्रिपदावर कायम राहिले हेते. विदेश दौऱयांदरम्यान चर्चच्या बैठकांमध्ये आपली हजेरी आणि चर्चचे नेते हाक जा हान मून तसेच अन्य पदाधिकाऱयांसोबत सामूहिक छायाचित्रे काढून घेतल्याची बाब स्मरणात नसल्याचा दावा यामागीवा वारंवार करत होते.