प्रतिनिधी /पणजी
1946 ते 1961 पर्यंत स्वातंत्र्य सेनानींनी क्रांतीची ज्योत गोव्यात पेटत ठेवली म्हणून आज आम्ही गोव्यात आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अंदमान तुरुंगाच्या धर्तीवर आग्वाद तुरुंगाला सर्वांनी एकदा भेट द्यावी. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्याची डागडुजी करण्याचे भाग्य मला लाभले असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, ज्योती कुंकळकर यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढय़ावर माहिती पट काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
ज्योती कुंकळकर निर्मित व दिग्दर्शित ’गोय स्वातंत्र्याचे होमखण’ या गोवा शासनाच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सौजन्याने काढलेल्या माहिती पटाच्या सीडीचे अनावरण गोवा क्रांती दिनी ईएसजी थिएटर मध्ये झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुणे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर उपस्थित होते.
दीपक बांदेकर म्हणाले, 1946 साली थोर स्वातंत्र्यसेनानी राम मनोहर लोहिया व जुलियो मिनेझिस यांनी गोव्यात क्रांतीची मशाल पेटवली व नंतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अपूर्व योगदान दिले. या माहिती पटामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास समजून घ्यायला मदत होईल.
गोव्याचा इतिहास हा शौर्याचा, त्यागाचा आहे. गोव्याच्या मुक्ती लढय़ावर माहितीपट काढण्याचे माझे स्वप्न होते. स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे आमच्या शेजारी रहायला आले होते त्यांचा सहवास लाभला, अनेक आठवणी ऐकता आल्या. हा माहितीपट शाळा महाविद्यालयाततून दाखवला जावा अशी विनंती ज्योती कुंकळकर यांनी मुखमंत्र्यांना केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते कुंकळी येथील स्वातंत्र्यसैनिका सुशीला नारायण पडियार यांचा सीडी व स्मृतिचिन्हभेट देऊन सन्मान करण्यात आला. चित्रपटासाठी संशोधन सूत्रसंचालन केलेले डॉ. प्रजल साखरदांडे, संकलन केलेले संजय सारंग, सहाय्यक संकलक जुईली पारीख, चित्रिकरण केलेले शिरीष राणे,ध्वनी संयोजक अजित कामत यांचाही सन्मान करण्यात आला. संपदा कुंकळकर यांनी पाहुण्यांचा सन्मान केला.विनंती कासार यांनी सूत्रसंचालन केले.समृद्धी कुंकळकर धोंड यांनी आभार मानले.
हा माहितीपट माहिती खाते, शिक्षण खाते, स्वातंत्र्यसैनिक संघटना यांनी सेन्स?र केल्यानंतर तो जरूर शाळा महाविद्यालयातून दाखवला जाईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.