डिसेंबर तिमाहीत महसूल 2 लाख कोटींवर ः जियोची चांगली कामगिरी
मुंबई
भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 17 हजार 806 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो वर्षाच्या स्तरावर पाहता 13 टक्के कमीच नोंदला गेलाय, अशी माहिती आहे. कंपनीने मागच्या वर्षी समान अवधीत 20 हजार 539 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. डिसेंबर 2022 संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल मात्र 15 टक्के वाढलेला दिसला. कंपनीने या अवधीत 2 लाख 20 हजार 592 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे जो मागच्या वर्षी याच अवधीत 1 लाख 91 हजार 271 कोटी रुपयांचा नोंदला गेला होता.
कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी, वर्षाच्या स्तरावर पाहता कंपनी चांगली मजबूत कामगिरी नोंदवत सर्व क्षेत्रात कंपनीची वाटचाल यशदायी ठरत आली आहे. सर्वच व्यवसायांनी चांगली कामगिरी केलेली आहे, असे म्हटले आहे.
जियोचा नफा वाढला
दुसरीकडे टेलिकॉम क्षेत्रातील जियोने डिसेंबरच्या तिमाहीत 28 टक्के अधिक नफा पदरात पाडला आहे. रिलायन्सच्या जियोने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 4 हजार 638 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो एक वर्ष आधी याच अवधीत 3 हजार 615 कोटी रुपये इतका होता. ग्राहकांच्या संख्येत पाहता जियो ही सर्वात मोठी भारतातील ंटेलिकॉम कंपनी ठरली आहे.