ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांना व्हिडिओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात हायकोर्टाने दिलासा दिला आहे. सीबीआयची कारवाई बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने कोचर दाम्पत्याची प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामिनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोचर दाम्पत्याने सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राखून ठेवला होता. आज हायकोर्टाने निकाल दिला. त्यावेळी कोचर दाम्पत्य तपास सहकार्य करत असतानाही या दोघांना विनाकारण अटक करण्यात आली. तसेच त्यांना अटक करताना कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली नाही, त्यामुळे कोचर दाम्पत्यांना झालेली अटक मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद हायकोर्टाने ग्राह्य धरला. या दोघांना प्रत्येकी 1 लाखांच्या रोख रकमेचा तात्काळ जामीन मंजूर करत त्यांना तपासयंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आ. रोहित पवार
काय होतं प्रकरण?
चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ असताना त्यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी कोचर दाम्पत्याने वेणुगोपाल धूत यांच्यासह नवी फर्म स्थापन करत त्यामध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगसह अन्य गुन्हे दाखल आहेत.