Tarun Bharat

धर्मांतरण करणारा शिवोलीचा डॉमनिक गजाआड

 धर्मांतरणाबाबत ठोस तक्रारी आल्यानंतर धडक कारवाई : हिंदुंच्या अनेक वर्षांच्या तक्रारींना मिळाला न्याय

प्रतिनिधी / म्हापसा

Advertisements

बेकायदेशीररित्या धर्मांतरण करून त्यांच्याकडे आलेल्यांच्या कुटुंबियांनाही धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱया शिवोली येथील फोर पिलर चर्च तथा बिलिव्हर्स संस्थेचे डॉमनिक डिसोझा याला अखेर म्हापसा पोलिसांनी काल गुरुवारी रात्री धडक कारवाई करत अटक केली आहे. कुचेली व खोर्ली येथील दोघांनी डॉमनिके आपले ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याच्या लेखी तक्रारी म्हापसा पोलिसात दिल्या होत्या. काही समाजकार्यकर्त्यांच्या दबावानंतर या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी डॉमनिक व त्याची पत्नी ज्युवॉन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात रात्री खळबळ माजली.

 मागील अनेक वर्षापासून डॉमनिक याच्याविरुद्ध हिंदू जनजागृती समिती, गोमंतक सेना, गोमंतक परशुराम सेना आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉमनिकच्या विरोधात आंदोलने सुरु ठेवली होती. धर्मांतराच्या लेखी तक्रारीही दिल्या होत्या. मात्र त्याला राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्याच्याविरुद्ध कुणीही कारवाई केली नव्हती. आता त्याला अटक केल्याबद्दल सर्वांनी म्हापसा पोलिसांचे अभिनंदन केले आहे. यावेळी राजकीय दडपण नसल्याने पोलिसांनी ही कारवाई करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.

यापुर्वी दोन शस्त्रक्रिया केल्याचा दावा

डॉमनिकला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रचंड आराडाओरड केली. आपण आजारी असल्याचे सांगितले. म्हापसा पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी म्हापसा जिल्हा हॉस्पिटलात नेले असता उच्च रक्तदाबामुळे त्याला हॉस्पिटलात ठेवावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉमनिकने डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर फेब्रुवारी 2022 मध्ये दोन ह्रदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या असून त्याची प्रकृती ढासळली आहे.

प्रकाश खोबरेकर यांची सुस्पष्ट तक्रार

कुचेली येथील प्रकाश कृष्णा खोबरेकर (वय 50) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी त्यांना घेऊन शिवोली येथील फोर पिलरमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होती. डॉमनिकने आपल्या पत्नीचे धर्मांतर केले होते. तिला धर्मांतर केल्यानंतर तो आपल्यावरही ख्रिश्चन होण्यास दबाव आणत होता. मात्र आपण हिंदू असल्याने धर्मांतर केले नाही. आपण धर्मांतर केले नाही, म्हणून डॉमनिकने आपल्यास धमकीही दिली. आपण शिकवतो तोच धर्म स्वीकारावा लागेल, अशी धमकीही त्यांने आपणास दिली, असे खोबरेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

खोबरेकर यांच्या तक्रारीनुसार कारवाई

खोबरेकर यांनी काल गुरुवारी लेखी तक्रार म्हापसा पोलिसात दिली. तिची दखल घेऊन पोलिसांनी भा. दं. सं. च्या कलम 153 (अ), 295 (अ), 506 (2) अ नुसार डॉमनिक व त्याची पत्नी ज्युवॉन या दोघांच्याविरुद्ध धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला.

निखिल शेटय़े यांची दुसरी तक्रार

दुसरी तक्रार खोर्ली म्हापसा येथील निखिल शेटय़े यांनी केली आहे. ते 22 मे रोजी आपल्या वडिलांना बरे वाटत नसल्याने शिवोली येथे डॉमनिक याच्याकडे गेले होते. तेथे डॉमनिकने निखिलच्या वडिलांना लावण्यास तेल दिले. त्यानंतर त्यांनाही हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगितले. शेटय़े यांनी तसे करण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर डॉमनिकने धर्मांतर करण्यास दबाव आणला. या प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या दुसऱया तक्रारीवरुन पोलिसांनी डॉमनिक डिसोझा गुरुवारी अगोदर ताब्यात घेऊन नंतर अटक केली.

डॉमनिक डिसोझाला हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. तेथून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.

पोलिसस्थानकावर बिलीवर्सवाल्यांची गर्दी

या अटक प्रकरणाची माहिती मिळताच म्हापसा पोलीस स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात बिलिव्हर पंथीयांची जमवाजमव झाली होती. सडये पंचायत क्षेत्रातील ट्रोपा येथील अवर लेडी ऑफ परसेक्मयूटेड चर्च परिसरात गेली कित्येक वर्षापासून बिलीवर पंथाच्या डॉमनिक डिसोझा तसेच गटाकडून प्रार्थनेचे आयोजन करण्यात येत आहे.

स्थानिक ख्रिस्ती व बिलीवर्समध्ये खटके

दर रविवारी शिवोली ट्रोपा परिसरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येत असलेल्या बिलीवर पंथियांच्या प्रार्थनेत हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असल्याने स्थानिक ख्रिस्ती समाज तसेच बिलीवर पंथीयांमध्ये अनेकदा खटके उडायचे. याबाबतीत म्हापसा पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत.

आपल्याला धर्मातर प्रकरणात अटक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच डॉमनिकने स्वतःला म्हापसा पोलिसांच्या अधीन करण्यापेक्षा म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करून घेण्याची पळवाट काढली.

आता शनिवार व रविवारी होते प्रार्थना

गेल्या अनेक वर्षांपासून फोर पिलर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी मोठी गर्दी होत होती. मात्र त्याच्या अनेक गैरकृत्यांबाबत अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्यामुळे त्याने फक्त शनिवार व रविवारीच प्रार्थना घेण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती हाती आली आहे. या प्रार्थनेसाठी मोठय़ा प्रमाणात लोक उपस्थित रहात होते, असे सांगण्यात आले. प्रकृती ढासळल्याने डॉमनिक आता फक्त शनिवार व रविवारी दोनच दिवस प्रार्थना घेत होता. प्रार्थनेच्या माध्यमातून तो धर्मांतर करीत होता, अशी माहिती मिळाली आहे.

पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी उपनिरीक्षक आशिष नाईक पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

काणकोणचे कृषी भवन नियोजित वेळेत पूर्ण होईल

Amit Kulkarni

मुसळधार पावसाने गोव्याला झोडपून काढले

Amit Kulkarni

मुरमुणे सत्तरी जुगारी अड्डय़ावर धाड

Patil_p

शांतादुर्गा फातर्पेकरीणचा जत्रोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

राष्ट्रीय महामार्गाची पाऊस्कर व उपमुख्यमंञी आजगावकर यांनी केली पाहणी

Patil_p

मुरगावच्या पालिकात यंदाही पाणीच पाणी-इमारतीच्या दुरूस्ती कामातील निष्काळजीपणा

Amit Kulkarni
error: Content is protected !!