Tarun Bharat

अग्निशामक दलाचे कार्य उल्लेखनीय

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा 

प्रतिनिधी / पणजी

अग्निशामक दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची मदत करीत असतात. गोवा अग्निशामक दलाचे काम खरोखरच उल्लेखनी आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा अग्निशामक दलाची प्रशंसा केली. रखरखत्या आगीत जाऊन एखाद्याचे प्राण वाचविणे किंवा आगीत भस्मसात होणारी मालमत्ता वाचविण्याचे ते आटोकाट प्रयत्न करीत असतात. काम जोखमीचे असते तरीही जवान सदैव तत्पर असता म्हणूनच ते कौतुकास पात्र ठरतात असेही ते म्हणाले.

गोवा अग्निशामक दलाने काल गुरुवारी राष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, माजी संचालक अशोक मेनन व इतर मान्यवर उपस्थित होते.

 गोवा अग्निशामक दल हे देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र आहे. केवळ गोव्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील अग्निशामक दलाचे जवानही गोव्यात प्रशिक्षण घेत असतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कर्तव्य बजावताना ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अग्निशामक दलाचे ध्वजारोहण करून परेड करून मानवंदना देण्यात आली.

अग्निशामक दल अधिक मजबूत होणार

गोवा अग्निशामक दल प्रत्येकवेळी आपल्या कामात तत्पर असते. अग्निशामक दलाने गेल्या वर्षभरात 271 माणसांचे जीव तर 632 जनावरांचे प्राण वाचविले आहेत तसेच सुमारे 52.80 कोटीची मालमत्ता वाचविली आहे. राज्यातील अनिशामक दल आणखी मजबूत करण्यासाठी तसेच अग्निशामक दलाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सरकारकडे काही मागण्या मांडलेल्या असून सरकारने त्याची पूर्तता करावी. राज्य सरकारकडून नियमित सहकार्य मिळत असून मागण्यांची पूर्तता नक्कीच होईल यात शंका नसल्याचे रायकर यांनी सांगितले.

विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे 

यावेळी वर्षभारात घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. अग्निशामक दलातर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 7 ते 10 वर्ष वयोगटातील पहिल्या गटात पहिले बक्षिस मिथाली मडगावकर (दीपविहार हायस्कूल, सडा) द्वितीय दिव्या नार्वेकर (फातिमा कॉनव्हेंट, मडगाव) तर तृतीय बक्षीस प्रद्युम्न परब (वेरे आयएनएस स्कूल) तसेच 11 ते 14 वर्षे या दुसऱया वयोगटात प्रथम बक्षीस कृणाल ब्रार (वास्को) द्वितीय ऋत्विक रिवणकर, तृतीय मैथली साळगांवकर (महिला नुतन हायस्कूल मडगाव) यांना प्राप्त झाले आहे. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

अग्निशामक दलाच्या जवानांना प्रशस्तीपत्रके

तसेच अग्निशामक दलातील ज्या जवानानी गेल्या वर्षभरात उत्कृष्ठ कामगीरी केलेली आहे त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. यात विनायक नायक लिडींग फायर फायटर वास्को केंद्र, हितेश परब सुधीर हळर्णकर फायर फायटर, अविनाश गावकर फायर फायटर वाळपई केंद्र, जानू ताटे फोंडा केंद्र, जितेंद्र भंडारी फोंडा केंद्र, नौजीत मुली, नरेंद्र शेटय़े पिळर्ण केंद्र, प्रशांत शेटगावकर म्हापसा केंद्र, हनुमंत म्हापारी म्हापसा केंद्र, बाबूराव आरोंदेकर पणजी मुख्यालय, शैलेश पैगिटकर फोंडा केंद्र, अनिकेत आमोणकर फोंडा केंद्र, संदीप नाईक फोंडा पेंद्र, गितेश नाईक कुंडई केंद्र, नारायण तटकर मडगाव केंद्र, रामा नाईक पणजी केंद्र, नागेश नाईक फोंडा केंद्र व देवानंद पार्सेकर फोंडा केंद्र यांचा समावेश होता.  

यावेळी अग्निशामक दलाने आपल्या कामाची प्रात्यक्षिके दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्निशामक दलाचे अधिकारी अजित कामत यांनी केले आणि शेवटी त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले.

Related Stories

सहवेदना जिजाबाई पाटील

Amit Kulkarni

जन उत्कर्ष सोसायटीच्या पर्वरी शाखेचे उद्घाटन

Amit Kulkarni

मगो-तृणमूल युती अभेद्य

Amit Kulkarni

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांची गोवा शिपयार्डला भेट

Amit Kulkarni

प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा गायक अन्वर शेख यांचा खून

Amit Kulkarni

उत्तर गोव्यात अजून 54 बेकायदा ‘कर्लिज’?

Amit Kulkarni