सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर यांची मागणी : सहकार निबंधकांवर मिलीभगत असल्याचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी गेल्या 17 महिन्यांपासून बेकायदेशीररित्या विराजमान असलेले उल्हास फळदेसाई यांची त्वरित हकालपट्टी करावी, तसेच सदर कालावधीसाठी त्यांना त्या पदी राहण्यास पाठबळ देणारे सहकार निबंधक यांना बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर यांनी केली आहे.
मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती एखाद्या संस्थेवर अशाप्रकारे बेकायदेशीरपणे सर्वोच्च स्थानी राहूच शकत नाही. त्यावरून फळदेसाई यांना गेल्या 17 महिन्यांपासून अध्यक्षपदी ठेवण्यात मोठा राजकीय वरदहस्त असल्याचे सिद्ध होते. त्याच बरोबर सहकार निबंधकांचीही त्यांच्याशी मिलीभगत असावी या संशयालाही पुष्टी मिळते. म्हणुनच ते बेकायदेशीररित्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यामुळे या कालावधीत झालेला प्रत्येक व्यवहार आणि अध्यक्षांनी घेतलेले निर्णयही पूर्णतः बेकायदेशीर ठरत आहेत, असे वेलिंगकर म्हणाले.
अशा या गंभीर प्रश्नी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. निश्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा व त्या दरम्यान फळदेसाई यांच्याकडून कर्मचाऱयांवर दबाव येऊ नये यासाठी त्यांना कार्यालयात प्रवेश करण्यास बंदी घालावी, अशी मागणी वेलिंगकर यांनी केली.
नोकरी घोटाळा होण्याची शक्यता
दरम्यान, राज्य सहकारी बँकेत तब्बल 177 जागा भरण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू झाल्याचे समजले असून सरकारने वेळीच हस्तक्षेप न केल्यास मोठा घोटाळा होण्याची भीती वेलिंगकर यांनी व्यक्त केली आहे. या बँकेच्या राज्यात 70 ते 80 शाखा आहेत. तेथील रिक्त जागा भरण्यासाठी या नियुक्त्या होणार असून मर्जीतील उमेदवारांचीच वर्णी लावता यावी यासाठी ’सेटिंग’ सुरू असल्याचा दावा वेलिंगकर यांनी केला. मात्र पात्रतेचे निकष डावलून नियुक्त्या झाल्याचे समजल्यास प्रसंगी न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्य सहकारी बँकेत सध्या सुरू असलेली बजबजपूरी हा या बँकेचे ग्राहक, भागधारक तसेच आश्रयदाते यांचा अपमान असून सरकारने वेळीच त्याची दखल घेऊन या सर्वांना न्याय द्यावा, असे आवाहन वेलिंगकर यांनी केले. पत्रकार परिषदेस सुनिल सांतिनेजकर आणि किथ फर्नांडीस यांची उपस्थिती होती.