मागच्या वर्षी घातली होती रिझर्व्ह बँकेने बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेने मास्टर कार्डवरील निर्बंध आता मागे घेतले आहेत. मागच्या वर्षी रिझर्व्ह बँकेने मास्टर कार्डच्या व्यवहारांवर निर्बंध घातले होते. माहिती साठवणुकी संदर्भातील मानदंडांना लागू करण्यात आल्यानंतर भारतामध्ये डेबिट, क्रेडिट आणि प्रिपेड कार्ड घेणाऱया नव्या ग्राहकांना सामील करून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मास्टरकार्डला परवानगी दिली आहे. मागच्या वर्षी जुलैमध्ये रिझर्व्ह बँकेने मास्टर कार्डवरती निर्बंध लादले होते. त्यावेळी त्यांना क्रेडिट, डेबिट व प्रिपेड कार्ड देण्यावर बंदी घालण्यात आली होती.
2007 पासून मास्टर कार्ड ही पैशाच्या देवाण घेवाणीसाठी वापरली जाणारी प्रणाली म्हणून लोकप्रिय ठरली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे मास्टर कार्डने स्वागत केले असून भारतातील लोकांसाठी तसेच व्यवसायांची डिजिटल गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आगामी काळात करण्यासाठी मास्टर कार्ड तत्पर असणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या नियमावलीला अनुसरुन व्यवहार होतील, हे मास्टरकार्ड कटाक्षाने पाहणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.