वृत्तसंस्था/ दुबई
भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुरला वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार आयसीसीने जाहीर केला.
मागील वर्षात तिने सीम व स्विंग गोलंदाजीचे उत्तम प्रदर्शन करीत वनडेमध्ये 14.88 च्या सरासरीने व 4.62 च्या इकॉनॉमी रेटने 18 बळी मिळविले तर टी-20 मध्ये 23.95 च्या सरासरीने व 6.50 च्या इकॉनॉमी रेटने 22 बळी टिपले. रेणुकाने ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राऊन, इंग्लंडची ऍलिस कॅप्से व भारताचीच यास्तिका भाटिया यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. वनडे व टी-20 मधील एकूण 29 सामन्यात तिने 40 बळी मिळवित झुलन गोस्वामीची उणीव भरून काढली. वनडेतील 18 पैकी आठ बळी तिने इंग्लंडविरुद्ध 2 सामन्यात तर 7 बळी लंकेविरुद्धच्या मालिकेत मिळविले. मागील वर्षी तिने 7 टी-20 सामन्यात भाग घेतला आणि त्यात तिने 8 बळी मिळविले. राष्ट्रकुल व आशिया चषक स्पर्धेत तिने 11 सामन्यात 5.21 च्या इकॉनॉमीने 17 बळी टिपले. ती आता भारताची भरवशाची गोलंदाज म्हणून संघातील स्थान बळकट करू लागली आहे.