जिल्हाधिकाऱयांची मनपाला सूचना : खडेबाजार परिसरात पाहणी : लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करा, विसर्जन मार्गावरील विद्युतवाहिन्या, दूरसंचार कंपन्यांच्या केबल दूर कराव्यात, महिलांसाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना केल्या.
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने बुधवारी समादेवी मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवेळी विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांनी सूचना मांडल्या. प्रारंभी आमदार अनिल बेनके यांनी गणेशोत्सवादरम्यान येणाऱया समस्या जिल्हाधिकाऱयांसमोर मांडल्या. गणेशोत्सवादरम्यान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे प्रकार तातडीने बंद करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील अनेक रस्ते खराब झाल्याने सार्वजनिक गणेशमूर्ती मंडपापर्यंत कशा आणायच्या? असा प्रश्न पदाधिकाऱयांनी उपस्थित केला. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याचे आरओ प्लँट सुरू करावे. विसर्जनादिवशी बससेवा व हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱयांनी या समस्या जाणून घेत मनपा, पोलीस, हेस्कॉम, अग्निशमन विभागांना सूचना
केल्या.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, एसीपी शरणप्पा, खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी, मनपा अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर, अग्निशमन अधिकारी व्ही. एस. टक्केकर, हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते अप्पण्णावर, हेमंत हावळ, शरद पाटील, प्रवीण पाटील, राजकुमार खटावकर, नगरसेवक शंकर पाटील, सुनील जाधव, अर्जुनसिंग रजपूत, नितीन जाधव, विजय जाधव यांसह इतर उपस्थित होते.
लोंबकळणाऱया विद्युतवाहिन्या हटवा…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सर्व अधिकाऱयांसमवेत समादेवी गल्ली, खडेबाजार परिसरात पाहणी केली. यावषी गणेशमूर्तींची उंची काही प्रमाणात वाढली असल्याने लोंबकळणाऱया विद्युतवाहिन्या दूर कराव्यात, अशा सूचना हेस्कॉमला केल्या. तसेच काही खासगी दूरसंचार कंपन्यांच्या वाहिन्या लोंबकळत असून, त्यांनाही कळविण्याच्या सूचना करण्यात आल्या.